ओल्या दुष्काळाचे सावट आतापर्यंत १५ हजार मिलिमीटर पाऊस : पिके आकसल्याने शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:33 AM2018-08-18T00:33:23+5:302018-08-18T00:33:32+5:30
पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला.
कोल्हापूर : पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्णात तब्बल १५ हजार २१५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ५२७ मिलिमीटर पाऊस अधिक झाला. सततच्या पावसाने खरीप पिके आकसली असून जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.
आपल्याकडे मान्सूनच्या चार महिन्यांत १५ दिवस जोरदार पाऊस, त्यानंतर आठ - दहा दिवस उघडझाप अशीच परिस्थिती राहते. जुलै महिन्यात पावसाचा जोर राहतो, त्यानंतर हळूहळू जोर कमी येतो. श्रावण महिन्यात तर ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळतो. अशा प्रकारचा पाऊस पिकांना पोषक असतो. पिकांना सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर त्याच्या वाढीवर परिणाम होतो. यंदा जिल्ह्णात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस एकसारखा सुरू आहे. ‘मृग’ नक्षत्रापासून पाऊस झोडपत असून, पुढचे नक्षत्र उघडेल, त्या पुढच्या नक्षत्रात पाऊस कमी होईल, अशी अटकळ शेतकºयांनी बांधली; पण अडीच महिने पाऊस थांबण्याचे नावच घेत नाही. त्याचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जमिनीत वापसाच नसल्याने वाढ खुंटली आहे. गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यात तर अतिवृष्टीमुळे उसाच्या पानांच्या चिंध्या उडाल्या आहेत. सूर्यप्रकाश नाही, त्यात पाने फाटल्याने अन्न निर्मितीच थांबल्याने ऊस खाली बसले आहेत.
गेल्यावर्षी १७ आॅगस्टपर्यंत जिल्ह्णात ९ हजार ९३७ मिलिमीटर पाऊस झाला होता, या वर्षी १५ हजार २१५ मिलिमीटरची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा तब्बल ५ हजार २७८ मिलिमीटर जादा पाऊस झाला आहे. अडीच महिन्यांत वार्षिक सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला. नदीकाठावरील ऊस पाण्याखाली गेल्याने ते संपले आहेत. उर्वरित ठिकाणी अतिवृष्टी आणि किडीच्या प्रादुर्भावाने ऊस, भातासह इतर पिके अडचणीत आली आहेत; त्यामुळे जिल्ह्णावर ओल्या दुष्काळाचे संकट पसरले असून, असाच पाऊस आणखी १५ दिवस राहिला, तर दुष्काळाचे संकट अधिक गडद होणार, हे मात्र निश्चित आहे.
तीन तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली
शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्याने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी १७ आॅगस्टपर्यंत एकाही तालुक्याने सरासरी ओलांडली नव्हती.
माणसाबरोबर जनावरेही कैंगाटली
एकसारख्या पावसाने माणसे वैतागून गेले आहेत; पण त्याबरोबर जनावरेही आता कैंगाटली आहेत. पावसामुळे अंगातील गारठा जात नसल्याने दूध उत्पादनावरही परिणाम झाला आहे.
सव्वादोन कोटींचे नुकसान
गेल्या वर्षी आतापर्यंत १९७ मालमत्तांची पडझड होऊन ४० लाख १७ हजारांचे नुकसान झाले होते; पण यंदा तब्बल २ कोटी ३२ लाखांचे नुकसान झाले आहे.