नूल परिसरात तीव्र पाणीटंचाई
By admin | Published: April 9, 2017 11:52 PM2017-04-09T23:52:10+5:302017-04-09T23:52:10+5:30
रात्री जागू लागल्या : हिरण्यकेशी नदीची पाणी पातळी घटली
संजय थोरात ल्ल नूल
हिरण्यकेशी नदीचे पात्र पूर्णत: कोरडे पडल्यामुळे नूल (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईस तोंड द्यावे लागत आहे. आठ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने बोअरच्या पाण्यासाठी लोकांची तोबा गर्दी होत आहे. रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी जागे राहावे लागत आहे.
नूलची लोकसंख्या आठ हजारांच्या आसपास आहे. निलजी व रामपूरवाडी येथे जॅकवेल बांधून गावात पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीने सुरू केली आहे. दीड कोटी रुपये खर्चून जलशुद्धिकरण केंद्राची उभारणी केली आहे. हिरण्यकेशी नदीत पाणीसाठा असेपर्यंत दररोज नळांद्वारे पाणीपुरवठा होत असे. गेल्या आठ दिवसांपासून नदीतील पाणी आटल्यामुळे हिरण्यकेशी कोरडी झाली आहे. त्यामुळे नूलकरांना पाणीटंचाईची झळ बसली आहे.
‘चित्री’चे पाणी सोडा
ग्रामपंचायतीने तनवडी रोडवरील पाण्याच्या टाकीत सार्वजनिक विहिरींचे पाणी सोडले आहे.
खर्चासाठी हे पाणी लोकांना उपयोगी पडते, तर हरिजन वसाहतीत असणाऱ्या बोअरचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. या दोन्ही ठिकाणी ग्रामस्थांची दिवस-रात्र गर्दी असते.
महिला, पुरुष, लहान मुले पाण्याचे गाडे, सायकली, मोटारसायकल घेऊन पाण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.
ग्रामदैवत हनुमानाची यात्रा पुढील आठवड्यात असल्याने चित्रीचे पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.