‘कृषिबंध’ विरोधात उपोषण -संचालकांवर गुन्हे नोंदवा : ताराराणी महिला आघाडीचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 01:20 AM2019-06-13T01:20:20+5:302019-06-13T01:21:36+5:30
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कृषिबंध अॅग्रो लिमिटेड कंपनीतील संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे नोंदवून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कडक कारवाई करावी या
कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कृषिबंध अॅग्रो लिमिटेड कंपनीतील संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे नोंदवून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कडक कारवाई करावी या मागणीसाठी ताराराणी महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अनंत गुरव यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कृषिबंध अॅग्रो लिमिटेड ही २०११ मध्ये राजारामपुरी (कोल्हापूर), हमीदवाडा व म्हाकवे (ता. कागल) येथे सुरू झाली. कंपनीचे पाचशेहून अधिक एजंटांचे जाळे पसरवून त्यांच्यामार्फत सर्वसामान्यांना शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, तसेच अन्य व्यवसाय उभे करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना काम, तसेच ठेवीदारांना अल्पावधीत जादा व्याज असे आर्थिक फायदे देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. कोल्हापूरसह सीमा भागातील सुमारे पाच हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी व्याजाच्या आमिषाला बळी पडून कृषिबंध अॅग्रो कंपनीत सुमारे दहा ते बारा कोटींहून अधिक रक्कम गुंतविली. आता कंपनीचे कार्यालय आणि संचालकांचे फोन बंद आहेत. संचालकांनी फसवणूक केल्याने गुंतवणूकदारांचा ससेमिरा एजंटांच्या मागे लागला आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ताराराणी महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली बुधवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. शिष्टमंडळाच्यावतीने अनंत गुरव यांना निवेदन दिले. आंदोलनात आघाडीच्या संस्थापक अध्यक्षा श्रद्धा महागावकर, महानंदा कांबळे, शमशाद शेख, सुशीला पाटील, प्रभावती कुंभार, अनुसया कुंभार, महादेवी चौगले, शांता जन्मट्टी, संगीता बामणे, अनिता लोखंडे, धोंडूबाई रावळ, भारती कोळी, शारदा पडवळे, नंदा कमते, हमिना तहसीलदार, रेश्मा कोंडेकर, अश्विनी खोत, नुरजान बागवान, आदींचा समावेश होता.
संचालकांवर कारवाईची मागणी
कृषिबंध अग्रो लि. कंपनीच्या संचालकांंमध्ये बंडोपंत कुंडलिक पाटील (रा. म्हाकवे, ता. कागल), शशिकांत हरी जाधव (सोनगे, ता. कागल), डॉ. कृष्णात केरबा कुंभार (आणूर, ता. कागल), सिद्राम रामचंद्र गंगाधरे (म्हाकवे, ता. कागल), नंदा शशिकांत जाधव (सोनगे, ता. कागल), शारदा अभिजित चौगुले (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.