ठेकेदाराविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 PM2020-01-03T18:00:06+5:302020-01-03T18:03:13+5:30
कोल्हापूर : बदलीची धमकी देऊन पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या मागणीसाठी ‘ महावितरण’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण ...
कोल्हापूर : बदलीची धमकी देऊन पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या मागणीसाठी ‘महावितरण’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीकडे ७०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत. यामध्ये पगारातील कमिशन देत नसल्यामुळे ठेकेदार आर. बी. जाधव व प्रवीण इलेक्ट्रिकल्स हे दोन ठेकेदार कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. दर महिन्याच्या पगारातून ९०० ते १००० रुपयांची मागणी केली जात आहे.
पैसे दिले नाही तर बदली करू, अशी धमकी देण्यात येते. संघटनेतील सहा पदाधिकाऱ्याच्या अशा प्रकारे बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आर. बी. जाधव आणि प्रवीण इलेक्ट्रिकल्स या दोन ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा. सप्टेंबर ते डिसेंबरचे थकीत वेतन तत्काळ द्या.
पदाधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करा, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी विजय कांबळे, रणजित पाटील, प्रेमसागर देसाई, सागर निगडे, युवराज सोनार, विक्रांत कवडे, कृष्णात यादव, राहूल माने, अमर लोहार उपस्थित होते.