मुंबई-कोल्हापूर मार्गावरील टोल नाक्यावर फास्टटॅगचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:38 AM2021-02-23T04:38:54+5:302021-02-23T04:38:54+5:30
सतीश पाटील : शिरोली : मुंबई-कोल्हापूर मार्गावरील टोलनाक्यावर नियोजनाअभावी फास्ट टॅगचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे चित्र आहे. फास्टटॅगमुळे ...
सतीश पाटील : शिरोली
: मुंबई-कोल्हापूर मार्गावरील टोलनाक्यावर नियोजनाअभावी फास्ट टॅगचा बट्ट्याबोळ झाला असल्याचे चित्र आहे. फास्टटॅगमुळे टोल नाक्यांवर लांबलचक रांगा लागत असल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. फास्टटॅगमुळे वाहनधारकांचा प्रत्येक टोल नाक्यावर ७ मिनिटे वेळ जात आहे. कोल्हापूर-मुंबई महामार्गावर सात टोलनाके असून, यात वाहनधारकांचा ५० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाया जात आहे. विशेष म्हणजे यात मालवाहतूक गाड्यांना सर्वाधिक फटका बसत आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर दररोज एक हजारपेक्षा जास्त माल वाहतूक गाड्या धावतात. फास्टटॅगमुळे टोलनाक्यावर गाड्या उशीरपर्यंत थांबत असल्याने एका गाडीचे सात सात लिटर डिझेल खर्ची होत आहे. कोल्हापूर- मुंबई जाता येता १२६० रुपयांचा जादा खर्च वाहनधारकांवर पडत आहे.
मुंबई-कोल्हापूर मार्गावर किणी, तासवडे, आनेवाडी, खेड शिवापूर दृतगती मार्गावरील तीन असे एकूण सात टोलनाके आहेत.
फास्टटॅग ज्या गाडीला आहे, त्या गाड्यांची स्वतंत्र लाईन, तर ज्या गाड्यांना फास्ट टॅग नाही, अशा गाड्यांची वेगळी लाईन आहे. फास्टटॅग नसेल, तर दुप्पट टोल वसुली सुरू आहे. पण ज्या वाहनांना फास्टटॅग आहे, ती वाहनेसुद्धा टोल नाक्यावरुन लवकर जात नाहीत. अनेक टोलनाक्यांवर गाड्यांचे ऑनलाईन फास्टटॅग स्क्रिनिंग लवकर होत नाही. त्यामुळे मोबाईल स्क्रिनिंग, हॅन्डमशीन स्क्रिनिंग, तर बऱ्याचवेळा स्क्रिनिंगला एरर येणे असे प्रकार सुरू आहेत. यामुळे गाड्यांना फास्टटॅग असूनही टोल नाक्यावर गाड्यांच्या रांगा लागत आहेत.
चौकट
: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नियमानुसार टोल नाक्यावरून माल वाहतूक गाडी तीन मिनिटांत टोल भरून गेली पाहिजे, असा नियम आहे; पण फास्टटॅगमुळे सध्या सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो आहे.
कोट : ऑल इंडिया परमिट गाड्यांचा रोड टॅक्स एकदाच भरून घ्यावा, अशी मागणी शासनाकडे केली आहे. फास्टटॅग यंत्रणा सुसज्ज नसल्याने याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. कोल्हापूर-मुंबई मार्गावर दररोज एक हजारपेक्षा जास्त मालवाहतूक गाड्या धावतात आणि सात टोल नाक्यांवर ७ लिटर डिझेल खर्ची होत आहे आणि ५० मिनिटे वेळ जात आहे. याचा वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे. (सुभाष जाधव - अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा लाॅरी व मालवाहतूक ट्रान्सपोर्ट असोसिएशन)