सतेज यांचा पैरा विधानसभेवेळी फेडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:18 AM2019-03-23T00:18:21+5:302019-03-23T00:22:06+5:30

काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पैरा कसा फेडायचा ते विधानसभेवेळी ठरवू. एका रात्रीत समीकरणे बदलतात, हे लक्षात ठेवून कोणतीही शंका मनात न ठेवता लोकसभेला संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा,

Fate of Satej during the Legislative Assembly | सतेज यांचा पैरा विधानसभेवेळी फेडू

सतेज यांचा पैरा विधानसभेवेळी फेडू

Next
ठळक मुद्देपालकमंत्री पाटील : ‘दक्षिण’च्या मेळाव्याकडे अमल महाडिक, शौमिका महाडिक यांची पाठ

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पैरा कसा फेडायचा ते विधानसभेवेळी ठरवू. एका रात्रीत समीकरणे बदलतात, हे लक्षात ठेवून कोणतीही शंका मनात न ठेवता लोकसभेला संजय मंडलिक यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.

येत्या रविवारी (दि. २४) तपोवन मैदानावर होणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेच्या पूर्वतयारीसाठी गोकुळ शिरगाव येथे आयोजित दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात ते बोलत होते. दक्षिणमधील पहिल्याच प्रचार मेळाव्यात भाजपचे या मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी पाठ फिरविली; तर संपूर्ण मेळाव्यात महाडिक यांच्यावर प्रत्यक्षपणे टीका करणे टाळल्याचे दिसले, याची सभास्थळी चर्चा होती.

आमदार सतेज पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार सुरू केला आहे, या पार्श्वभूमीवर मंडलिक यांनी मी सतेज यांचा पैरा फेडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विधानसभेला मंडलिक भाजपला मदत करतील का, अशी शंका कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. त्यासंबंधी पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘विधानसभेचे पुढच्या पुढे बघू. आता फक्त लोकसभेवर लक्ष केंद्रित करा. त्यांच्या मदतीचा पैरा कसा फेडायचा, ते नंतर बघू. आमदार अमल महाडिक यांना अडचण असली तरी ते देखील युतीचाच प्रचार करतील. खासदार धनंजय महाडिक व त्यांच्या कुटुंबीयांशी माझे कुणाचे नाहीत इतके जिव्हाळ्याचे संबंध आहेत; पण तरीही मी या धर्मयुद्धात युतीच्याच मागे उभा राहणार आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे. एक खासदार राष्ट्रवादीचा निवडून दिला तर काय होते? अशी कुजबूज दक्षिणमध्ये आहे ती चुकीची असून हे देशाचे राजकारण आहे, येथे एकेक खासदार निवडून येणे सध्या महत्त्वाचे असल्याने काहीही करून मंडलिक यांनाच निवडून आणण्यासाठी प्रत्येक गावात सभा घ्या, घराघरांत पोहोचा.’

मंडलिक म्हणाले, ‘ज्ञात-अज्ञात अशा सर्व शक्तींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्या जोरावरच यावेळी विक्रमी मताधिक्याने निवडून येणार असा मला विश्वास वाटत आहे. मागील निवडणुकीत ‘दक्षिण’मधून मला सहा हजार मते कमी पडली. यावेळी सरकारने कार्यकर्त्यांना पदांच्या माध्यमातून दिलेली ताकद, पालकमंत्र्यांचे पाठबळ याचाही आपल्यालाच फायदा होणार आहे.’

नितीन बानुगडे-पाटील यांनी रविवारी होणारी प्रचाराची सभा ही विजयाची रंगीत तालीम असणार आहे, असे सांगितले.यावेळी अरुण दुधवडकर, महेश जाधव, संजय पवार, संदीप देसाई, बाबा देसाई, सुजित चव्हाण, आर. डी. पाटील, शुभांगी पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Fate of Satej during the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.