मुलाला फासावर लटकवत पित्याची गळफास घेऊन आत्महत्या, कोल्हापुरातील कणेरी येथील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 02:17 PM2024-04-22T14:17:33+5:302024-04-22T14:18:57+5:30
कारणांचा शोध सुरू; मोठा मुलगा बचावला
कोल्हापूर : कणेरी येथील पोवार कॉलनीत भाड्याच्या खोलीत खेळणी विक्रेता विठ्ठल बाळासाहेब पाटील (वय ३७) आणि त्यांचा मुलगा वेदांश (वय ४) यांचे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळले. दोन्ही मृतदेहांवर रविवारी (दि. २१) पाटील यांच्या मूळ गावी चिक्कोडी (जि. बेळगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शनिवारी (दि. २०) दुपारी घडलेल्या घटनेत पाटील यांचा मोठा मुलगा सुदैवाने बचावला. दरम्यान, पोटच्या मुलाला फासाला लटकवून विठ्ठल यांनी गळफास घेण्याचे कारण काय असावे, याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचा विठ्ठल पाटील हा गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत त्याच्या पत्नीचे माहेर होते. पत्नी क्रांती, पाच वर्षांचा मुलगा विक्रांत, तीन वर्षांचा वेदांश आणि विठ्ठल असे चौघांचे कुटुंब कणेरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. तिरुपती बालाजी येथे देवदर्शन करून परतलेले पाटील कुटुंब क्रांती यांच्या माहेरी शिवाजी पेठेत गेले होते.
शनिवारी सकाळी दोन्ही मुलांना घेऊन विठ्ठल हे रंकाळ्यावर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र, ते थेट कणेरी येथील घरी गेले. दोन्ही मुलांना झोपवून त्यांनी छताच्या लोखंडी पाइपला दोरीने तीन फास बांधले. एका फासात लहान मुलाला लटकवले. त्यानंतर दुसऱ्या दोरीने स्वत: गळफास घेतला. काही वेळाने मोठा मुलगा विक्रांत हा उठल्यानंतर त्याला वडील आणि भाऊ वेदांश हे दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्याने वडिलांच्या मोबाइलवरून आईला फोन करून हा प्रकार सांगितला. क्रांती यांनी माहेरच्या नातेवाइकांना कणेरी येथे पाठवल्यानंतर वडिलांनी मुलासह गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
गोकुळ शिरगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सीपीआरमध्ये पाठवले. उत्तरीय तपासणीनंतर रविवारी पाटील यांच्या मूळ गावी चिक्कोडी येथे दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पती आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने क्रांती आणि त्यांच्या नातेवाइकांना धक्का बसला.
कारणांचा शोध सुरू
विठ्ठल हा काही वर्षे गोकुळ शिरगाव येथील औद्योगिक वसाहतीत काम करीत होता. त्यानंतर त्याने यात्रा, जत्रा आणि आठवडी बाजारांमध्ये खेळणी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. आर्थिक अडचणीतून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अन्य कारणांचाही शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.