बुडणाऱ्या लेकीस वाचवले, मात्र स्वत:चा जीव नाही वाचवू शकले; कोल्हापुरातील ह्दयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 11:34 AM2023-02-06T11:34:13+5:302023-02-06T11:37:00+5:30

पत्नीने आरडाओरडा केला, मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून अंत झाला.

Father dies while saving daughter from drowning, Incident at Gadmudshingi in Kolhapur | बुडणाऱ्या लेकीस वाचवले, मात्र स्वत:चा जीव नाही वाचवू शकले; कोल्हापुरातील ह्दयद्रावक घटना

बुडणाऱ्या लेकीस वाचवले, मात्र स्वत:चा जीव नाही वाचवू शकले; कोल्हापुरातील ह्दयद्रावक घटना

googlenewsNext

कोल्हापूर : आई-वडिलांसोबत खणीवर कपडे धुण्यासाठी आलेली स्वत:ची शाळकरी मुलगी पाण्यात बुडत असल्याचे पाहून वडिलांनी जीव घोक्यात घालून तिला बाहेर ढकलले; मात्र ते स्वत:चा जीव वाचवू शकले नाहीत. पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही मन हेलावणारी घटना गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे रविवारी दुपारी घडली. सतीश दत्तात्रय गोंधळी (वय ४५) असे मृत वडिलांचे नाव आहे. ऐन यात्रेपूर्वीच घडलेल्या या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

गडमुडशिंगी येथील यात्रेला आज, साेमवारपासून प्रारंभ होणार आहे. घरोघरी यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. रविवारी सकाळी सतीश गोंधळी, पत्नी सिंधू आणि शाळकरी मुलगी तृप्तीसोबत घरातील अंथरूण, पांघरूण असे मोठे धुणे धुण्यासाठी गावातील खाणीवर गेले होते. मुलगी कपडे धुण्यासाठी पालकांना मदत करीत होती.

पाण्याचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडू लागली, हा प्रकार लक्षात येताच पोहता येत नसतानाही वडिलांनी पाण्यात उतरून मुलीला बाहेर ढकलले. मुलगी बचावली; मात्र, तोल गेल्यामुळे वडील पाण्यात बुडाले. पत्नीने आरडाओरडा केला, मात्र मदतीला कोणी नसल्याने त्यांचा दुर्दैवाने पाण्यात बुडून अंत झाला.

ऐन यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपल्या मुलीला वाचविताना पित्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याच्या घटनेने ग्रामस्थांचे मन हेलावून गेले. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सतीश यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, सोमवारी सकाळी आहे.

Web Title: Father dies while saving daughter from drowning, Incident at Gadmudshingi in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.