अकरा महिन्यांच्या चिमुकलीला आईने विकले, बापाने शोधले; कोल्हापूर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:32 PM2024-05-13T17:32:52+5:302024-05-13T17:33:12+5:30
चिमुकलीला एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकले होते
कोल्हापूर : निहृदयी आईने अवघ्या ११ महिन्यांच्या चिमुकलीला एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकले होते. याबाबत बापाने फिर्याद दिल्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांना चिमुकलीचा शोध लावण्यात यश आले नाही. अखेर बापानेच गोव्यात जाऊन चिमुकलीचा शोध घेऊन तिचा ताबाही मिळवला. या घटनेतून मुलीला कुशीत घेण्यासाठी आसुसलेल्या बापाची तळमळ स्पष्ट आली, तर निवडणूक कामाचे कारण पुढे करून केवळ तपास सुरू असल्याचे सांगणाऱ्या पोलिसांची कार्यपद्धती सर्वांसमोर आली.
इंगळी (ता. हातकणंगले) येथील पूनम दिलीप ढेंगे (वय २८) हिने पतीला कोणतीही कल्पना न देता तिची ११ महिन्यांची मुलगी एक लाखात गोव्यातील दाम्पत्याला विकली होती. हा प्रकार लक्षात येताच १६ एप्रिल रोजी दिलीप ढेंगे यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मुलीची आई पूनम ढेंगे हिच्यासह तिचा मित्र सचिन कोंडेकर, एका रुग्णालयातील कर्मचारी किरण पाटील आणि मुलगी विकत घेणाऱ्या गोव्यातील दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला होता.
चिमुकलीच्या शोधासाठी दोन वेळा पथक गोव्याला जाऊन आल्याची माहिती पोलिसांनी फिर्यादी ढेंगे यांना दिली. मात्र, तिचा शोध लागला नव्हता. निवडणूक बंदोबस्ताचे कारण देऊन पोलिसांकडून तपासात चालढकल सुरू होती. अखेर चिमुकल्या मुलीचे वडील दिलीप ढेंगे यांनीच गोव्यातील संशयित दाम्पत्याचा फोन नंबर आणि पत्ता मिळवला. त्यांच्याशी संपर्क करून मुलगी परत देण्याची विनवणी केली.
अखेर ७ मे रोजी एका वकिलाच्या मध्यस्थीने त्यांनी गोव्यात जाऊन फातिमा फर्नांडिस आणि जेरी पॉल नो-होन्हा यांच्याकडून मुलीचा ताबा घेतला. कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन गोव्यातील दाम्पत्यानेही आढेवेढे न घेता मुलीचा ताबा दिला. दोन दिवसांपूर्वीच बापाने मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या संपूर्ण घडामोडींमध्ये एका पित्याची मुलगी परत मिळवण्यासाठी सुरू असलेली धडपड यशस्वी झाली. त्याचवेळी पोलिसांच्या तपास कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
सौदा सहा लाखांचा?
मुलगी दिल्यानंतर तिच्या आईला एक लाख रुपये मिळाले होते. मात्र, मुलगी मिळविण्यासाठी गोव्यातील दाम्पत्याने सहा लाख दिल्याची माहिती समोर येत आहे. मधल्या मध्ये पाच लाख कोणी हडप केले? संशयितांना अशा प्रकारे आणखी काही बाळांची विक्री केली आहे काय? याचा छडा लावण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.