Kolhapur-गुप्तधनासाठी अघोरी प्रकार: वडिलांना सापडला सोन्याचा जिन्नस अन् ४५ वर्षे डोक्यात खूळ

By उद्धव गोडसे | Published: July 4, 2024 05:15 PM2024-07-04T17:15:42+5:302024-07-04T17:16:01+5:30

कौलवमधील शरद मानेला पछाडले : मांत्रिकांवर हजारो रुपये उधळले 

Father found a gold coin and for 45 years Sharad Dharma Mane thought of secret money in Radhanagari Kolhapur district | Kolhapur-गुप्तधनासाठी अघोरी प्रकार: वडिलांना सापडला सोन्याचा जिन्नस अन् ४५ वर्षे डोक्यात खूळ

Kolhapur-गुप्तधनासाठी अघोरी प्रकार: वडिलांना सापडला सोन्याचा जिन्नस अन् ४५ वर्षे डोक्यात खूळ

उद्धव गोडसे 

कोल्हापूर : कौलवमध्ये (ता. राधानगरी) ४५ वर्षांपूर्वी घर बांधताना धर्मा माने यांना खड्ड्यात एक सोन्याचा जिन्नस सापडला होता. तीच घटना मनात ठेवून गेली ३० वर्षे शरद धर्मा माने (वय ५२, रा. कौलव) हा गुप्तधन मिळविण्याच्या मागे लागला होता. त्यासाठी त्याने अनेक मांत्रिकांवर हजारो रुपये उधळले. गुप्तधन सापडले नाहीच शिवाय संसाराची राख झाली. आता तर गुप्तधनाच्या लालसेपोटी त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागत आहे.

राधानगरी तालुक्यातील सधन गावांपैकी एक असलेल्या कौलवची अर्थव्यवस्था शेती आणि दूध व्यवसायावर अवलंबून आहे. याच गावातील धर्मा माने यांनी ४५ वर्षांपूर्वी वडिलोपार्जित जागेत छप्परवजा घर उतरवून त्या ठिकाणी पक्के घर बांधण्यास सुरुवात केली. त्यावेळी खोदलेल्या खड्ड्यात धर्मा माने यांना एक सोन्याचा जिन्नस सापडला होता. तेव्हा त्यांचा मुलगा शरद हा सात वर्षांचा होता. त्यानंतर घरात गुप्तधन असल्याच्या गोष्टी अनेकदा त्याच्या कानावर पडल्या. लहान वयात डोक्यात बसलेले गुप्तधनाचे खूळ पुढे कायम राहिले. गेल्या ३० वर्षांत त्याला गुप्तधनाच्या लालसेने पछाडले. तीन जापत्याच्या घरात देवघरात गुप्तधन असल्याचा त्याचा समज होता. त्यामुळे तो देवघरात सहसा कोणाला जाऊ देत नव्हता.

गुप्तधन मिळवून देणाऱ्या मांत्रिकांच्या शोधातील शरद माने याला गावातील एकाने पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. त्याच्या संपर्कातून शरद काही मांत्रिकांपर्यंत पोहोचला. गेल्या चार-पाच वर्षांत त्याने अनेक मांत्रिकांना घरी बोलावून पूजाअर्चा, विधी केले. कराडमधील मांत्रिकांची माहिती मिळताच त्याने त्यांच्याशी संपर्क साधून गुप्तधन मिळवून देण्याची विनंती केली. त्यासाठी ५० ते ६० हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार १५ दिवसांपूर्वीच त्याने देवघरात खड्डा खोदून ठेवला. मंगळवारी शरद माने याच्यासह मांत्रिकाच्या टोळीचे कृत्य उघडकीस आले आणि कौलवसह परिसरात खळबळ उडाली.

पती-पत्नीमध्ये वाद

अटकेतील शरद माने याचे गुप्तधनाचे खूळ त्याच्या पत्नीला पटत नव्हते. यावरून दोघांमध्ये वारंवार वादाचे खटके उडत होते. १५ दिवसांपूर्वी त्याने घरात खड्डा खोदल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. मात्र, गुप्तधनाचे खूळ माने याच्या डोक्यातून गेले नाही.

मांत्रिकांच्या टोळ्या सक्रिय

पैशाचा पाऊस पाडून देतो, दुप्पट रक्कम करून देतो, गुप्तधन मिळवून देतो, पुत्र प्राप्तीसाठी औषध देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या मांत्रिकांच्या टोळ्या सक्रिय आहेत. या टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांना विशेष मोहीम राबवावी लागणार आहे.

Web Title: Father found a gold coin and for 45 years Sharad Dharma Mane thought of secret money in Radhanagari Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.