लग्नात मोटार मागे घेताना धडकल्याने वराच्या वडिलांचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 06:06 PM2021-07-21T18:06:18+5:302021-07-21T18:09:35+5:30
Accident Kolhapur : लग्नकार्य व्यवस्थित पार पडले अन् कार्यालयानजीक मोटारकार पाठीमागे घेताना चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगाने येऊन धडकल्याने वराच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
कोल्हापूर : लग्नकार्य व्यवस्थित पार पडले अन् कार्यालयानजीक मोटारकार पाठीमागे घेताना चालकाचा त्यावरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगाने येऊन धडकल्याने वराच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.
उत्तम महादेव हरणे (वय ६२, रा. सरनाईक वसाहत, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना कोल्हापूर ते गगनबावडा रोडवर शिंगणापूर फाटा येथे घडली. याप्रकरणी कारचालक शुभम लक्ष्मण माने (रा. इंगळी, ता. गडहिंग्लज) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि. १८) हरणे यांच्या मुलाचे शिंगणापूर फाटा येथील एका मंगल कार्यालयात लग्न झाले. वऱ्हाडी मंडळी घरी परतली, त्यावेळी साहित्य नेण्यासाठी लगबग सुरु झाली. या कार्यालयाच्या बेसमेंटनजीक शुभम माने चालवत असलेल्या मोटारीला पाठीमागे घेण्यासाठी वराचे वडील उत्तम हरणे हे दिशा दाखवत होते, त्यावेळी मोटारकार मागे घेताना त्यावरील ताबा सुटला व कार भरधाव वेगाने मागे येऊन हरणे यांना धडकली.
त्यावेळी कार्यालयाच्या पायरीवर डोके आपटल्याने हरणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हरणे हे पायरीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले, पण पोलीस तपासात त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मोटारकारचालक शुभम माने याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.