उपचार परवडत नसल्याने कोल्हापुरात वडिलांचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:29 AM2019-10-07T04:29:23+5:302019-10-07T04:29:33+5:30
सीपीआर रुग्णालयात २१ मे रोजी नामदेव भास्कर पलंगावर झोपून होते.
कोल्हापूर : औषधोपचारांचा खर्च परवडत नसल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर ) उपचार घेत असताना चुलत्याच्या मदतीने मुलाने वडिलांचा गळा आवळून खून केल्याचे पाच महिन्यानंतर पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी करवीर पोलिसांनी मुलगा संशयित गिरीश नामदेव भास्कर (३२) याला अटक केली. त्याचा चुलता तुकाराम पांडुरंग भास्कर (५३) हा पसार आहे.
नामदेव पांडुरंग भास्कर (६३) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, शेतमजूर असलेल्या नामदेव यांच्यावर दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही त्यांचा त्रास कमी होत नव्हता. घरची परिस्थिती गरिबीची, त्यातच वारंवार वडिलांच्या औषधोपचारांवर होणाऱ्या खर्चामुळे भास्कर कुटुंबीय हतबल झाले होते.
सीपीआर रुग्णालयात २१ मे रोजी नामदेव भास्कर पलंगावर झोपून होते. त्यांना सलाईन लावले होते. यावेळी मुलगा गिरीश व त्याचे चुलते तुकाराम भास्कर दोघेजण सेवेला होते. येथील कर्मचारी, परिचारिकेचे लक्ष नसल्याचे पाहून गिरीशने त्यांच्या हाताचे सलाईन काढून टाकले. तुकाराम यांनी भाऊ नामदेव यांच्या नाकात कापसाचे बोळे घालून रुमालाने गळा दाबून त्यांचा खून केला. शवविच्छेदन केल्यानंतर डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला होता. शनिवारी (दि. ५) त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याआधारे तब्बल पाच महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली.