पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास पाच वर्षे सक्तमजूरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 07:21 PM2021-11-17T19:21:48+5:302021-11-17T20:05:17+5:30
फिर्यादी आरोपीची पत्नी, आई, व पिडीत मुलगी हे फितूर झाले. तरीही न्यायालयाने आकाश लाटकर याला शिक्षा सुनावली.
कोल्हापूर : स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी पोक्सो कायद्यांतर्गत पाच वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारी अभियोक्ता मंजुषा पाटील यांनी काम पाहिले. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे बाप-लेकीच्या नात्याला कलंक लागला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहराच्या उपनगरात आरोपी सहकुटूंब राहत होेता. तो काहीही कामधंदा करत नव्हता. त्याची पत्नी व आई कामावर जाऊन कौटुंबिक खर्च चालवत. दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी पत्नी व आई कामावर गेले असता घरी कोणीही नव्हते. त्यावेळी आरोपीने आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार केला. दि. २२ ऑक्टोबर २०२० ला रात्री त्याने स्वता:च्या मुलीकडे अश्लील फोटो काढण्याची मागणी केली. पत्नीने जाब विचारल्यावर संतप्त झालल्या आरोपीने पत्नी व आईचा तलवार घेऊन पाठलाग केला. घाबरलेल्या कुटुंबियांने सांगली फाट्यानजीक सासऱ्याच्या घरी अश्राय घेतला. याबाबत त्याच्या पत्नीने राजारामपूरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीला अटक झाली.
फिर्यादी, पिडीत फितूर, तरीही शिक्षा
खटल्यात सहा साक्षिदार तपासले. फिर्यादी आरोपीची पत्नी, आई, व पिडीत मुलगी हे फितूर झाले. तरीही राजारामपूरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान घुगे, पोलीस निरीक्षक अंजना फाळके या तपास अधिकारी व पंचांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षी आणि सरकारी वकील मंजूषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अशोक शिंगे, सहायक फौजदार शाम बुचडे यांनी काम पाहीले.