अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेक जागीच ठार, पुणे-बंगळुरू महामार्गावर शिये फाट्याजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 12:19 PM2023-02-28T12:19:19+5:302023-02-28T12:19:43+5:30
अपघातानंतर बराच वेळ जखमी रस्त्याकडेलाच पडून होते
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिये फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील बाप-लेक जागीच ठार झाले. विश्वास अण्णाप्पा कांबळे (वय ५५) आणि पंकज विश्वास कांबळे (वय २४, दोघे रा. मौजे वडगाव, ता. हातकणंगले) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी (दि. २७) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला.
सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे वडगावचे विश्वास कांबळे आणि त्यांचा मुलगा पंकज हे दोघे सोमवारी सायंकाळी कामानिमित्त मोपेडवरून कोल्हापुरात आले होते. काम आटोपून परत जाताना महामार्गावर शिये फाट्याजवळ त्यांच्या मोपेडला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात रस्त्यावर कोसळलेल्या दोघांच्या डोक्याला आणि तोंडाला जबर दुखापत झाली.
अपघातानंतर बराच वेळ जखमी रस्त्याकडेलाच पडून होते. अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस घटनास्थळी पोहोचले. १०८ रुग्णवाहिकेतून दोन्ही जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मृत विश्वास कांबळे यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.
कुटुंबावर काळाचा घाला
विश्वास कांबळे अल्पभूधारक शेतकरी होते. पत्नी आणि दोन मुलांसह शेतीसोबत मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. अचानक काळाने घाला घातल्यामुळे बाप-लेक ठार झाले. अपघातामुळे मौजे वडगाववर शोककळा पसरली.
दीड तासाने जखमी रुग्णालयात
साडेआठच्या सुमारास अपघात घडल्यानंतर सुमारे पाऊण तास दोन्ही जखमी रस्त्याकडेला पडले होते. या काळात शेकडो वाहने रस्त्यावरून गेली. मात्र, अनेकांनी केवळ डोकावून पाहण्यातच धन्यता मानल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित जखमींचे प्राण वाचले असते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.