Kolhapur: चार वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधम बापास २० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 02:24 PM2024-07-25T14:24:52+5:302024-07-25T14:25:19+5:30
जानेवारी २०२० मधील गुन्हा, पत्नीने कोडोली पोलिसांत दिली होती फिर्याद
कोल्हापूर : अंगणवाडीत शिकणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या स्वत:च्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने नराधम बापाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी बुधवारी २० वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जानेवारी २०२० मध्ये गुन्हा घडल्यानंतर आरोपीच्या पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
अतिरिक्त सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कोडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पत्नी आणि तीन मुलींसह राहत होता. २२ जानेवारी २०२० रोजी अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलीच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने तिच्यासोबत आई, मोठी बहीण, मावशी, मामा, असे शाळेत गेले होते. त्यावेळी पीडित मुलीने ओटीपोटात दुखत असल्याचे आईला सांगितले. आईने पाहणी केली असता, मुलीच्या ओटीपोटाखाली सूज आल्याचे लक्षात आले. कुठे पडली का? काही लागले का? अशी विचारणा केल्यानंतर वडिलांनी घरात आणि परसात तीन वेळा तिच्यासोबत केलेल्या गैरकृत्याची माहिती मुलीने दिली.
पतीनेच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे लक्षात येताच पत्नीने कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी नराधम बापावर गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
१२ साक्षीदार तपासले
ॲड. मंजूषा पाटील यांनी न्यायाधीशांसमोर १२ साक्षीदार तपासले. यात पीडित मुलीसह तिची मोठी बहीण, आई, मावशी, मामा, वैद्यकीय अधिकारी आणि शाळेतील शिक्षिकेची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष आणि ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अग्रवाल यांनी आरोपीस २० वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून त्याला कळंबा कारागृहात पाठवले.
नात्याला काळिमा फासणारी घटना
मुलीचा सर्वाधिक विश्वास आई- वडिलांवर असतो. मात्र, नराधम बापाने चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून नात्यालाच काळिमा फासला. त्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला.