‘आबांनी’ स्वाभिमान गहाण ठेवून तडजोड करू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:11+5:302021-03-25T04:24:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग संपुष्टात आला आहे. त्यामुळे केवळ माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग संपुष्टात आला आहे. त्यामुळे केवळ माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर (आबा) यांनी बंधने पाळू नयेत, पाटील यांनी स्वाभिमान गहाण ठेवून तडजोड करू नये, असे भावनिक आवाहन पन्हाळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. केवळ शाहुवाडी तालुक्याचा विचार त्यांनी करू नये, पन्हाळा तालुक्याने त्यांना कायम साथ दिल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
‘गोकुळ’ निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सत्यजित पाटील यांनी विरोधी राजर्षी शाहू आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक आमदार विनय काेरे यांनीही या आघाडीला पाठिंबा दिल्याने पन्हाळा व शाहुवाडीतील शिवसेना पदाधिकाऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. याबाबत कोतोली (ता. पन्हाळा) येथे पन्हाळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी फक्त शाहुवाडी तालुक्याचा विचार करू नये. पन्हाळा तालुक्यामध्येही माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर यांना मानणारी निष्ठावंतांची फौज आहे. त्यांच्या सहकार्याने पन्हाळ्यातील वाडी-वस्तीमध्ये अनेक दूध संस्था स्थापन केलेल्या आहेत. कोडोली, सातवे परिसराबरोबरच ‘बांधारी’ परिसरातील कार्यकर्त्यांचा विचार सत्यजित पाटील यांनी करावा. मागील विधानसभा निवडणुकीत पन्हाळ्यातील जनतेने त्यांना ३६ हजार मते दिली, त्याकडे दुर्लक्ष करू नये. जे विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत गेले, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसणार का? ‘गोकुळ’मध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग संपुष्टात आला असून, पाटील यांनी बंधने पाळू नयेत, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
बैठकीला शिवसेना तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील (जाफळे), डी. जी. पाटील (कोतोली), विजय पाटील (उत्रे), प्रकाश पाटील (कोतोली), बाजीराव पाटील (घोटवडे), किरण पाटील (कोडोली), अजित पाटील (माले), माणिक पाटील (सातवे), अरुण पाटील (पोर्ले), तातोबा गायकवाड, पोपट पाटील (वाघवे) आदी उपस्थित होते.