कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!; स्वप्नीलच्या यशामागे वडिलांचा संघर्ष

By पोपट केशव पवार | Published: August 2, 2024 04:01 PM2024-08-02T16:01:17+5:302024-08-02T16:02:00+5:30

पोपट पवार कोल्हापूर : मुलगा खेळामध्ये प्रावीण्य मिळवतोय; पण आपणाकडे त्यासाठी लागणारी आर्थिक रसद नाही, ही खंत त्यांना होतीच; ...

Father's struggle behind Olympic shooting bronze medalist Swapnil Kusale success | कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!; स्वप्नीलच्या यशामागे वडिलांचा संघर्ष

कर्ज काढून मुलाला खेळवलं, त्यानं कष्टाचं माेल जाणलं!; स्वप्नीलच्या यशामागे वडिलांचा संघर्ष

पोपट पवार

कोल्हापूर : मुलगा खेळामध्ये प्रावीण्य मिळवतोय; पण आपणाकडे त्यासाठी लागणारी आर्थिक रसद नाही, ही खंत त्यांना होतीच; पण पोराच्या स्वप्नासाठी बाप हरेल कसा? त्यांनी कर्ज काढून पोराला खेळवलं अन् पोरानेही थेट ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक मिळवत बापाच्या अपार कष्टाची उतराई केली. स्वप्नील सुरेश कुसाळे असं या जिद्दी पोराचं नाव.

कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडी (ता. राधानगरी) हे अवघ्या १२०० लोकवस्तीचं स्वप्नीलचे गाव. वडील घोटवडे (ता. राधानगरी) जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक, तर आई अनिता गावच्या लोकनियुक्त सरपंच. स्वप्नीलचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्यानंतर पाचवी ते सातवीचे शिक्षण शेजारील भोगावती पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी माध्यमातून झाले. येथेच त्याला खेळाची आवड निर्माण झाली. त्यातूनच त्याची पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतून निवड झाल्यानंतर त्याला सांगलीचे केंद्र मिळाले. त्याने या केंद्रातच असतानाच नेमबाजीवर लक्ष केंद्रित केले. नेमबाजीच माझ्या करिअरची दिशा ठरवेल हा विश्वास त्याने ढळू दिला नाही.

मिरजच्या आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तो दाखल झाला. त्याच्या नेमबाजीला याच स्कूलमध्ये खऱ्या अर्थाने अचूकता आली. येथे असताना त्याने राज्यस्तरीय नेमबाजीत स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी ‘वादळा’ची चुणूक दाखवून दिली. पुढे कुवेत येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत विजेतेपद असा विवध स्पर्धांमध्ये पदकांचा धडाकाच त्याने लावला. २०२२ मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात चौथा क्रमांक मिळवत त्याने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट फायनल केले.

हा प्रवास प्रचंड जिकिरीचा

नेमबाजी हा तसा महागडा खेळ. वडील सुरेश हे शिक्षक असले तरी त्यांना मुलाची नेमबाजीतील हौस पूर्ण करण्याइतपत परिस्थिती नव्हती; मात्र मुलाची नेमबाजीमधील आवड अन् जिद्द पाहून वडिलांनी कर्ज काढून त्याच्या खेळाला बळ दिले. ‘मागचे पाहू नको, तू खेळावर लक्ष केंद्रित कर हा सल्ला मी वारंवार देत होतो. कालपर्यंत माझ्या मनाची घालमेल सुरू होती; पण तो जिंकेल हा विश्वास होता. त्याने तो विश्वास सार्थ तर ठरवलाच; पण आमच्या कष्टाचीही जाणीव ठेवली’ या शब्दांत सुरेश कुसळे यांनी भावना व्यक्त केल्या.

आजी म्हणते, मुके घेऊन कौतुक करणार

नातवाच्या पराक्रमाने स्वप्नीलच्या आजीचा आनंद गगनात मावेना झाला. तो परत येताच त्याचे मुके घेऊन कौतुक करणार, या शब्दांत त्यांनी नातवाचे अभिनंदन केले. माझ्या नातवाने करून दाखवले, आमचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे, असे सांगताना आजीच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून आला.

मुलगा कधी ना कधी या खेळात नाव कमवेल हा विश्वास होता. त्यामुळे कर्ज काढून त्याला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानेही आमच्या कष्टाची जाणीव ठेवत हे यश मिळवले. - सुरेश कुसाळे, वडील.
 

मुलाचे दहा-बारा वर्षांचे कष्ट फळाला येतील. तो भारताचा तिरंगा खाली पडू देणार नाही, हा विश्वास होता. - अनिता कुसाळे, आई.

Web Title: Father's struggle behind Olympic shooting bronze medalist Swapnil Kusale success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.