पडलेल्या उसामुळे वाडे मिळविताना दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:25 AM2020-12-06T04:25:49+5:302020-12-06T04:25:49+5:30
जहाँगीर शेख : कागल : कागल परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठे ...
जहाँगीर शेख : कागल : कागल परिसरात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हजारो हेक्टर ऊस जमीनदोस्त झाला होता. सुदैवाने उत्पादनात फारशी घट झाली नसली तरी जनावरांच्या हक्काचा चारा असणारे ‘वाडे’ मिळविताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. ऊस खाली पडल्याने त्याचे शेंडे सुकून गेले आहेत, अथवा तुटले आहेत.
उसाचा गळीत हंगाम सुरू झाला की, दूध उत्पादक आणि पशुधन पालक उसाचे वाडे चारा म्हणून उपयोगात आणतात. निम्माहून अधिक ऊसतोडणी चारा मिळण्याच्या उद्देशानेच केली जाते. ऊसतोडणी मजूर आपल्यापुरता हा चारा ठेवून उर्वरित विक्री करतात. मात्र, यावर्षी कागल परिसरात ऊस मोठ्या प्रमाणात पडलेला असल्याने या दोन्ही घटकांना अधिकचा चारा मिळविताना दमछाक करावी लागते. मात्र, ऊस पीक मुबलक असल्याने अजून या वैरणीची टंचाई भासत नाही. इतर जिल्ह्यातून आलेल्या मजुरांनाही वैरण विक्रीतून फारसा लाभ मिळताना दिसत नाही.
सातच्या आत बिंडा गोठ्यात..
शेती आणि खासगी नोकरी मजुरीच्या जोडीला एक दोन गायी, म्हशी पाळण्याचा ट्रेंड आहे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी वैरणीची जोडणी करण्याचा प्रयत्न असतो. ऊसतोडणी मजुरांशी जवळीक साधलेली असते. त्यामुळे कोठे ऊसतोडणी आहे, हे आदल्या दिवशी समजते. पहाटे ऊसतोडणी मजूर येण्यापूर्वीच हे वैरणवाले फडात हजर असतात. सकाळी सातला दुचाकीवरून बिंडा घरात नेलेला असतो. असे चित्र या भागात आहे.
वैरणीसाठी ऊसतोडणी मजूर.. उसतोडणी मजुरासाठी बीड परिसरातील लोकांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, रोख पैसे, उचल घेऊनही न येण्याचे प्रकार सरास होत आहेत. त्यातून कारखाना व्यवस्थापणाने स्थानिक टोळी तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या ऊसतोडणी मजुरांच्या टोळीत वैरणही हवी तेवढी मिळते आणि मजुरीही. या हिशेबाने स्थानिक लोक सहभागी झाले आहेत.