‘फौजी बापूं’नी आणली शितोंडीतून अनामत रक्कम : ‘हातकणंगले ’मधून अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:31 PM2019-04-04T17:31:51+5:302019-04-04T18:12:55+5:30

चिकुर्डे (ता.शिराळा, जि.सांगली) येथील माजी सैनिक आनंदराव वसंतराव सरनाईक उर्फ फौजी बापू यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हलगीच्या गजरात शितोंडीच्या मडक्यातून अनामत रक्कम आणली. त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी

'Fauji Bapu' brought amount from depository deposit: 'Hathkangale' | ‘फौजी बापूं’नी आणली शितोंडीतून अनामत रक्कम : ‘हातकणंगले ’मधून अर्ज दाखल

 चिकुर्डे (ता.शिराळा, जि.सांगली) येथील माजी सैनिक आनंदराव वसंतराव सरनाईक उर्फ फौजी बापू हे गुरुवारी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हलगीच्या गजरात शितोंडी घेऊन आले. त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाबाहेरच रोखले.(छाया : आदित्य वेल्हाळ)

Next
ठळक मुद्देपोलिसांची उडाली तारांबळ : अखेर पोलिसांना फौजीबापूंची समजूत काढण्यात यश आले.

कोल्हापूर : चिकुर्डे (ता.शिराळा, जि.सांगली) येथील माजी सैनिक आनंदराव वसंतराव सरनाईक उर्फ फौजी बापू यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हलगीच्या गजरात शितोंडीच्या मडक्यातून अनामत रक्कम आणली. त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकावरच अडवून शितोंडी घेऊन जाण्यास मज्जाव केला.परंतु फौजीबापू आपल्या भूमिकेवर ठाम राहील्याने पोलिसांची तारांबळ उडाली. मात्र, पोलिस त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी ते मडके बाहेर ठेवून आत जाऊन हातकणंगले मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केला.

फौजी बापू उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिरडी व शितोंडी घेऊन येणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फौजी बापू हे कार्यकर्त्यांसह दुपारी बाराच्या सुमारास महावीर कॉलेज परिसरात आले. येथून हलगी व घुमक्याच्या गजरात हातात शितोंडी घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले.

या ठिकाणी शंभर मीटरच्या बाहेरच त्यांना पोलिसांनी रोखले. यावर हे मडके म्हणजे सुटकेस किंवा पिशवी समजा आणि मला आत जाऊ द्या, यावर पोलिसांनी हे आक्षेपार्ह असून तुम्हाला शंभर मीटरच्या आत ते घेऊन जाता येणार नाही असे सांगितले. परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. कायद्याने मला कोणीही ही शितोंडी नेण्यापासून रोखू शकत नाही. माझे वकील येऊ द्या, तेच तुम्हाला सांगतील, असे सांगून त्यांनी वकिलांना फोन लावला. त्यांची समजूत घालताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. अखेर पोलिसांना फौजीबापूंची समजूत काढण्यात यश आले.

यानंतर ते मडके बाहेर ठेवून अर्ज दाखल करण्यासाठी आत गेले. या ठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यांनी यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये अर्ज दाखल केला आहे.

तुम्ही अशा पध्दतीने अर्ज दाखल का करत आहात? अशी विचारणा उपस्थितांनी केल्यावर फौजी बापू म्हणाले, सैनिकांकडे कुणाचेही लक्ष नाही, माजी सैनिकांची दखल कुठलाही राजकीय पक्ष घेत नाही. उलट धनदांडग्यांसह अभिनेत्यांना पायघड्या घालतात. एकंदरीत हे चित्र अन्यायकारक व संतापजनक आहे. याचा निषेध करण्यासाठी आपण ही शितोंडी आणल्याचे त्यांनी सांगितले.



 

Web Title: 'Fauji Bapu' brought amount from depository deposit: 'Hathkangale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.