फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने नांगरे-पाटील यांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:19 PM2019-03-01T13:19:21+5:302019-03-01T13:43:21+5:30

पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.

'Fay Arwell Parade' to the Nangre-Patil, through a well-decorated police vehicle | फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने नांगरे-पाटील यांना निरोप

फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने नांगरे-पाटील यांना निरोप

googlenewsNext
ठळक मुद्देफुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल परेड’ने नांगरे-पाटील यांना निरोप कोल्हापूरची ‘शिदोरी’ नवी आव्हाने पेलण्यास उपयुक्त : विश्वास नांगरे-पाटील यांची भावना

कोल्हापूर : पुरोगामी विचारांची जनता आणि तत्पर, प्रशासकीय कौशल्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे मी चांगले काम करू शकलो. आपल्या सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छांची शिदोरी मला नवी आव्हाने पेलण्यासाठी उपयुक्त ठरेल अशा भावना कोल्हापूर परिक्षेत्राचे मावळते विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी येथे व्यक्त केल्या.

जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित नांगरे-पाटील यांची नाशिकला पोलिस आयुक्त झाल्याबध्दल निरोप समारंभ आणि नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस गार्डनमधील या कार्यक्रमास ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’ चे संपादक वसंत भोसले, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक विजय जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महानगरपालिकेचे नूतन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांचा सत्कार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते, तर नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक वारके यांचा सत्कार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते शाल आणि भेटवस्तू देऊन करण्यात आला. सत्कारानंतर पोलीस दलाने नांगरे-पाटील यांना फुलांनी सजविलेल्या पोलिस गाडीतून ‘फेअरवेल सेरेमनी’ने निरोप दिला.

नांगरे-पाटील म्हणाले, ‘मी आजपर्यंत कोणत्याही ठिकाणी निरोप स्वीकारलेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आला की, बॅग घेऊन पुढे निघतो. मात्र, आज कोल्हापुरातून जाताना मन भरून आले आहे. माझे मामा पोलीस दलात होते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना, मानसिक घुसमट यांची जाणीव आहे. ही वेदनाच संवेदना समजून कोल्हापूर परिक्षेत्रात पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्य, त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला बळ देणारे उपक्रम राबविले.‘निर्भया’ पथकाच्या माध्यमातून महिला सुरक्षा, समुपदेशनाचे काम आणि गुन्हेगारी कमी करण्याचे काम करण्यात यशस्वी ठरलो.

नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके म्हणाले,‘माझ्या सेवेची सुरुवात येथूनच झाली. त्यामुळे शिवशाहूंच्या कोल्हापुरात पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. नांगरे-पाटील यांनी सुरू केलेले उपक्रम, त्यांचा ‘सोशल पोलिसिंग’चा दृष्टिकोन े पुढे घेऊन जाईन.’

कार्यक्रमास रूपाली नांगरे-पाटील, डॉ. सोनाली देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने, आदींसह मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी आभार मानले.

वडिलांचे स्वप्न साकार..

मला कोल्हापुरात पोलीस अधिकारी म्हणून काम केलेले पाहणे हे वडिलांचे स्वप्न होते. विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रुजू होताना ते माझ्या स्वागतासाठी कार्यालयात आले होते. त्यांचे स्वप्न साकार केल्याचे मला समाधान आहे, असे सांगताना नांगरे-पाटील भावूक झाले.
 

 

Web Title: 'Fay Arwell Parade' to the Nangre-Patil, through a well-decorated police vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.