ST Strike : कारवाईच्या भीतीने नाधवडे येथील एसटी चालकाची आत्महत्या, भुदरगड तालुक्यातील दुसरी दुर्देवी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 07:42 PM2022-01-11T19:42:36+5:302022-01-11T19:43:58+5:30
गारगोटी : एसटी कर्मचारी संपाचा तिढा न सुटल्याने नाधवडे ता. भुदरगड येथील एसटी चालकाने कारवाईची भीती व आर्थिक विवंचनेतून ...
गारगोटी : एसटी कर्मचारी संपाचा तिढा न सुटल्याने नाधवडे ता. भुदरगड येथील एसटी चालकाने कारवाईची भीती व आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. धनाजी मल्हारी वायदंडे (वय-३९) असे या एसटी चालकाने नाव आहे. या दुर्दैवी घटनेबाबत सर्वत्र हळहळ तर कर्मचाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मृत धनाजी वायदंडे हे १२ वर्षे चालक म्हणून सेवा बजावीत होते. ते गेली ८ वर्षे गारगोटी आगाराकडे कार्यरत होते. वायदंडे हे इतर कर्मचाऱ्यांबरोबरच संपात सहभागी झाले होते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे. संप काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांची ओढाताण होत होती.
दरम्यान गेल्या ५ जानेवारी रोजी त्यांना गारगोटी आगारामार्फत शिस्त व आवेदन कार्यपद्धती अंतर्गत कारवाई सुरू करण्याची नोटीस बजावली होती. ही नोटिस आज मंगळवार (ता. ११) रोजी त्यांना मिळाली त्यामुळे ते प्रचंड मानसिक ताणतणावाखाली गेले. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान भुदरगड तालुक्यातील ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्याने शासनाच्या वेळकाढू धोरणाबद्दल कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वायदंडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी करत शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.