लोकांच्या मनांत उतरली पूर्ण लॉकडाऊनची भीती..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:22 AM2021-04-11T04:22:40+5:302021-04-11T04:22:40+5:30
कोल्हापूर : दोन दिवसांच्या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीच झाली असली तरी कोल्हापूरकरांची शनिवारची सकाळ आळसावलेली होती. उठून काय करायचे ...
कोल्हापूर : दोन दिवसांच्या लॉकडाऊनची सुरुवात शुक्रवारी रात्रीच झाली असली तरी कोल्हापूरकरांची शनिवारची सकाळ आळसावलेली होती. उठून काय करायचे आहे म्हणून बराच वेळ लोक अंथरुणातच पडून राहिले. शनिवारी सकाळी मात्र लागू झालेला लॉकडाऊन पुढे ३० एप्रिलपर्यंत कायम होणार की काय, या भीतीनेच अनेकांची गाळण उडाली. पोहे खात लोकांनी वृत्तवाहिन्यांवरील बातम्यात त्याचे काही उत्तर मिळते का, याचा शोध घेतला.
लोकमतच्या प्रतिनिधीने सकाळी साऱ्या शहरभर फेरफटका मारला. रस्त्यावर अत्यंत तुरळक वर्दळ दिसत होती. ज्यांच्या घरातील अचानक गॅस संपला होता, ते टाकीला चादर गुंडाळून मोटारसायकलवरून नवीन सिलिंडर आणायला निघाले होते. ग्रामीण भागातून दूध घेऊन आलेले गवळी घरोघरी दुधाचे वाटप करत होते. महापालिकेचे आरोग्य कर्मचारी त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते. ओला कचरा..सुका कचऱ्याची धून सगळीकडे वाजत होती. तुंबलेली गटर्स काढण्याचे कामही सुरू होते. सकाळच्या टप्प्यात गाडी धुणे, घरातील स्वच्छतेची कामे सुरू होती.
फुलांचा वासही नव्हता..
रक्त तपासणी प्रयोगशाळा व तुरळक कुठेतरी दवाखाना सुरू होता. दूध विक्री केंद्रे मात्र सुरू होती. कपिलतीर्थ भाजी मार्केट झाकलेल्या भाजीपाल्याचे ढीग घेऊन विश्रांती घेत होते. शिंगोशी मार्केटला फुलांचा वास आला नव्हता. अंबाबाईच्या मंदिरात बाहेरूनच हात जोडणारा भाविकही दिसत नव्हता..
असा होता दिनक्रम..
लोकांनी घरी बसून लोकमत वाचून कोल्हापूर शहर, राज्यासह देशातील कोरोना स्थिती जाणून घेतली. काही जणांनी जाणीवपूर्वक आवडीचे वाचन केले. काहींनी व्हॅाटस ॲपवरील मेसेज वाचण्यात व ते दुसऱ्याला पाठविण्यात आनंद शोधला. पैपाहुण्यांशी, मित्रांशी फोनवरून ख्याली खुशालीही विचारली गेली. दिवसभर टीव्हीवरील मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणे, चमचमीत खाणे, विश्रांती आणि रात्र आयपीएलची मॅच पाहण्यात घालवली.
दहावी-बारावीचे काय..
ज्या कुटुंबात दहावी-बारावीची मुले आहेत त्या पालकांची चिंता तर वेगळीच होती. या परीक्षा होणार की लांबणार, याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. परीक्षा लांबणीवर जातील म्हणून मुलांनीही अभ्यासातून अंग काढून घेतल्याने पालक हवालदिल झाले होते. सर्वांच्या परीक्षा रद्द झाल्या, लांबणीवर पडल्या; परंतु दहावी-बारावीचा काहीच निर्णय न झाल्याने सारेच हैराण आहेत.