corona virus-‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 02:23 PM2020-03-17T14:23:07+5:302020-03-17T14:29:14+5:30

कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.

The fear of 'corona' slowed down the pace of life | corona virus-‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम

कोल्हापुरात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून बहुतांश नागरिक हे तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्दे‘कोरोना’च्या भीतीने जनजीवनाची गती मंदावली;व्यवहारांवर परिणाम व्यापारी, बाजारपेठांमधील गर्दी ओसरली; नागरिकांकडून मास्क, रूमालाचा वापर

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या भीतीने कोल्हापूरमधील जनजीवनाची गती मंदावली आहे. रस्त्यांवरील गर्दी ओसरत आहे. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे.

दक्षता म्हणून बहुतांशजण हे मास्क लावूनच दैनंदिन कामे करीत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणे नागरिक टाळत असल्याने आठवड्याचा पहिला दिवस असूनही सोमवारी शहरातील प्रमुख व्यापारीपेठा, बाजारपेठा, रेल्वेस्थानक, महाद्वाररोड, आदी परिसरात तुरळक गर्दी दिसून आली.

विविध विभागांची शासकीय कार्यालयाने सुरू असल्याने रविवारपेक्षा शहरातील रस्त्यांवरील गर्दी वाढल्याचे दिसली, पण ती नेहमीच्या तुलनेत कमीच होती. बिंदू चौक, शिवाजी रोड, महाद्वाररोड, शाहूपुरी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, गुजरी, पापाची तिकटी, आदी परिसरातील अनेक दुकानांमध्ये काहीसा शुकशुकाट दिसून आला.

उद्याने, बगीचे आणि रेल्वेस्थानक परिसरात कमी गर्दी दिसून आली. दक्षता म्हणून अधिकतर नागरिक हे मास्क अथवा तोंडाला रूमाल बांधून बाहेर पडत आहेत. काहींनी, तर घरात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. उपनगर, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचेही प्रमाण घटले आहे.

भीतीपोटी मंडईत गर्दी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस भाजी मिळणार नसल्याची भीती नागरिकांमध्ये असल्याने त्यांची मंडईमध्ये सोमवारीही गर्दी झाली. मंडईत रविवारी नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी होती आणि ती बऱ्याच वर्षांनंतर झाली. भाज्यांची आवक चांगली आहे. दरात वाढ झाल्याची अफवा असल्याचे कपिलतीर्थ मंडईतील भाजी विक्रेते सागर करीगार यांनी सांगितले.

रिक्षाचालकांना प्रतीक्षा

लोकांनी घराबाहेर पडणे बंद केल्याने रिक्षाचालकांना प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आज, जरा चांगली स्थिती आहे. मात्र, नंबर येण्यासाठी दीड ते दोन तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सीबीएस स्टँड परिसरातील रिक्षाचालक चंद्रकांत भोसले यांनी सांगितले.

घरी जाण्याची घाई

शिवाजी विद्यापीठ, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये दि. ३१ मार्चंपर्यंत वर्ग भरणार नाहीत. त्यामुळे वसतिगृह, कॉटबेसेसवर राहणारे विद्यार्थी, विद्यार्थिनींची आपल्या गावी, घरी जाण्यासाठी घाई सुुरू आहे. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकामध्ये गर्दी झाली.

दुकाने दुपारी बंद

गेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांचे घटलेले प्रमाण आणि उन्हाचा तडाखा यामुळे शहरातील विविध भागांतील काही व्यावसायिकांनी दुपारी दोन ते तीन तास दुकाने बंद ठेवली. ‘कोरोना’मुळे लोक घराबाहेर पडणे टाळत असल्याने बाजारात शांतता असल्याचे चप्पल व्यावसायिक दीपक खांडेकर यांनी सांगितले.
 

 

 

Web Title: The fear of 'corona' slowed down the pace of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.