घुणकीत गव्यामुळे भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:23 AM2021-03-15T04:23:08+5:302021-03-15T04:23:08+5:30
नवे पारगाव : घुणकी (ता. हातकणंगले) येथील मंगोबा मंदिराजवळ शिवारात गवा आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगोबा दैवताच्या ...
नवे पारगाव : घुणकी (ता. हातकणंगले) येथील मंगोबा मंदिराजवळ शिवारात गवा आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगोबा दैवताच्या यात्रेदिवशीच गव्याने दर्शन दिल्याने गावात धास्ती निर्माण झाली आहे.
गावाच्या उत्तरेकडील बाजूला दीड किलोमीटरवर ढाग रस्त्यावरील कोंडार भागात सकाळी दहाच्या सुमारास काही शेतकरी गवताची कापणी करीत होते. तेथील शेतकरी प्रशांत जाधव, कृष्णात सनदे, बी.के. मोहिते, प्रशांत रासकर यांना गवा उसाच्या शेतात जाताना दिसला. त्यानंतर अकराच्या सुमारास मंगोबा देवाच्या मंदिराच्या मागील बाजूला मोहिते रस्त्यावरील रामचंद्र मोहिते यांच्या उसाच्या शेतात आला असल्याची माहिती मिळताच युवकांचा तांडा तिकडे वळला.
दिग्विजय मोहिते, विशांत मोहिते, महेश मोहिते, आकाश मोहिते, आदेश मोहिते, संभाजी मोहिते, शिवाजी पोवार यांच्यासह पंचवीसहून युवकांनी गव्याला हुसकावून लावले. बाळासाहेब हरी मोहिते यांच्या शेतात गवा ठाण मांडून बसला. त्यामुळे रामचंद्र मोहिते व बाळासाहेब मोहिते यांच्या शेतीचे नुकसान झाले.
दरम्यान वनविभागाचे खाडे यांनी पाहणी केली.
१४ घुणकी गवा
फोटो ओळी : घुणकी येथील शेतात दिसणारा गवा.