बिबट्याचे भय महिनाभरापासून कायम
By admin | Published: September 11, 2014 09:57 PM2014-09-11T21:57:44+5:302014-09-11T23:17:00+5:30
नरंदे, कुंभोज परिसर : वनविभाग मात्र संभ्रमात
कुंभोज : नरंदे (ता. हातकणंगले) पासून दानोळी (ता. शिरोळ) या गावांच्या दक्षिणेकडील बाजूच्या डोंगराच्या पायथ्याशी पसरलेल्या विस्तीर्ण ऊसपट्ट्यात सध्या बिबट्याचा वावर असल्याच्या भीतीने गेल्या महिनाभरापासून शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात शेळ्या-मेंढ्या तसेच घोडा जखमी होण्याच्या घटना घडूनही बिबट्याच्या पाऊलखुणा न मिळाल्याने वनविभागास याचे गांभीर्य नाही.
मात्र, सहा महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दानोळीच्या वाघमारे मळ्यातील लहान मुलगा ठार झाल्याच्या घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या. कुंभोज, दानोळी, नेज, आदी परिसरातील शेतकरी शेतात-शिवारात भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
महिन्यापूर्वी नरंदेच्या वाझरा परिसरात शेळ्या-मेंढ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली. आणखी एका हल्ल्यात कुंभोजच्या विष्णू पुजारी यांचा घोडा जखमी झाला आहे. गेल्या आठवड्यात कवठेसार-दानोळी दरम्यान उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाल्याचे शेतकरी सांगतात. काल दानोळीच्या दळवी मळ्यातील गीतांजली दळवी यांना बिबट्या दिसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांच्या मनातील बिबट्याची भीती आणखी गडद झाली. ज्या परिसरात शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले, त्या ठिकाणी वनरक्षक आर. बी. मोरे, राऊत यांनी पाहणी केली असता अद्यापही बिबट्याच्या पाऊलखुणा मिळाल्या नसल्याने बिबट्या असल्याची पुष्टी वनविभाग देण्यास तयार नाही.
२८ मे २००८ रोजी दानोळीच्या वाघमारे मळ्यात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलगा ठार झाल्यानंतर वनविभागाची बिबट्या असल्याची खात्री झाली. तोपर्यंत वनविभाग बिबट्या नाही, असे ढोल बडवीत होता. (वार्ताहर)