कुरिअर पार्सलमध्ये अंमली पदार्थांची भीती; कोल्हापुरातील औषध विक्रेत्यास ६८ लाखांचा गंडा

By उद्धव गोडसे | Published: August 1, 2024 12:47 PM2024-08-01T12:47:18+5:302024-08-01T12:47:46+5:30

अधिकारी असल्याची बतावणी, पाच संशयितांवर गुन्हा; फसवणुकीचा दुसरा प्रकार

Fear of narcotics in courier parcels; 68 lakhs to a medicine seller in Kolhapur | कुरिअर पार्सलमध्ये अंमली पदार्थांची भीती; कोल्हापुरातील औषध विक्रेत्यास ६८ लाखांचा गंडा

कुरिअर पार्सलमध्ये अंमली पदार्थांची भीती; कोल्हापुरातील औषध विक्रेत्यास ६८ लाखांचा गंडा

कोल्हापूर : 'तुम्ही पाठवलेल्या कुरिअर पार्सलमध्ये मुंबई विमानतळावर अंमली पदार्थ आणि संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. तुमच्या बँक खात्यांची पडताळणी करणे गरजेचे आहे,' अशी भीती घालून पाच जणांनी योगेंद्र रघुनाथ ठाकूर (वय ५३, रा. फिरंगाई मंदिराजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना ६८ लाख ५५ हजार ५५४ रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २२ ते २९ जून दरम्यान घडला. ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. ३१) रात्री पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला.

पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेंद्र ठाकूर हे नाशिक येथे औषध कंपनीत विक्री प्रतिनिधी पदावर काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी ते नोकरी सोडून कोल्हापुरात आले. २२ जूनला दुपारी त्यांच्या मोबाइलवर व्हॉट्सअप कॉल आला. मुंबई विमानतळावरून सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी अनिल गुप्ता बोलत असून, 'तुम्ही पाठवलेल्या कुरिअर पार्सलमध्ये २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप आणि ३५ हजार रुपयांची रोकड सापडली आहे. याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होऊ शकते,' असे सांगून त्याने पुढे सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी विक्रमसिंग, याच शाखेतील पोलिस उपायुक्त आणि आयुक्त नितीन पाटील, आरबीआयचे फायनान्सियल डिपार्टमेंट हेड जॉर्ज मॅथ्यू या नावाच्या व्यक्तींशी बोलणे घडवले.

या सर्वांनी ठाकूर यांना कारवाईची भीती घालून त्यांच्या आणि आई, वडिलांच्या बँक खात्यांची माहिती घेतली. खात्यांमधील पैसे कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत, याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी एका बँक खात्यावर पैसे पाठवण्यास सांगितले. भीतीपोटी ठाकूर यांनी ६८ लाख ५५ हजार ५५४ रुपये ऑनलाईन वर्ग केले. त्यानंतर संशयितांचे मोबाइल नंबर बंद झाले. पैसे परत आपल्या खात्यात जमा होतील, असे समजून त्यांनी महिनाभर वाट पाहिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

फसवणुकीचा दुसरा प्रकार

दोन महिन्यांपूर्वी याच पद्धतीने नवोदिता घाटगे यांची २० लाखांची फसवणूक झाली होती. त्यानंतर ठाकूर यांची ६८ लाख ५५ हजारांची फसवणूक झाली. फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने संशयितांचा शोध लागणे गरजेचे बनले आहे.

Web Title: Fear of narcotics in courier parcels; 68 lakhs to a medicine seller in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.