धास्ती कायम..त्यामुळेच काळजी महत्त्वाची कोरोनाची वर्षपूर्ती : वणवा लागू नये यासाठीच घेऊ जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:34+5:302021-03-23T04:26:34+5:30
कोल्हापूर : काळजी, पुरेशी दक्षता घेत व शासनाने घालून दिलेले नियम पाळल्यामुळेच गेल्यावर्षी कोल्हापूरची कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली आहे. ...
कोल्हापूर : काळजी, पुरेशी दक्षता घेत व शासनाने घालून दिलेले नियम पाळल्यामुळेच गेल्यावर्षी कोल्हापूरची कोरोनाच्या संसर्गातून सुटका झाली आहे. आताही तीच दक्षता बाळगणे गरजेचे आहे. कारण पुन्हा लॉकडाऊन, जनता कर्फ्यू असे उपाय आपल्याला परवडणारे नाहीत. कोरोना जनता कर्फ्यूची वर्षपूर्ती होत असताना प्रत्येकाच्या मनांत कोरोनाची धास्ती कायम आहे. गेल्यावर्षी सुरुवात एका रुग्णाने झाली व पाहता पाहता रुग्णसंख्या वाढत गेली. रुग्णांना उपचार करायला दवाखाने पुरले नाहीत अशी स्थिती उद्भवली होती. त्यातून जनजीवन ठप्प झाले. अनेकांचे रोजगार गेले. नुसते उद्योग-व्यवसायाचेच चक्र थांबले नाही तर सारा गावगाडाच थांबला. त्या परिणामातून आपण अजूनही बाहेर आलेलो नाही. कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आहे. ती आटोक्यात आहे म्हणून आपण बेफिकीरपणे वागू लागलो तर ५० चा आकडा ५०० वर जायला वेळ लागणार नाही. त्यामुळेच मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळून व्यवहार, अनावश्यक गर्दी टाळणे या गोष्टींवर आपण सर्वांनीच आपली जबाबदारी म्हणून भर दिला पाहिजे. वणवा लागू नये म्हणून काळजी घेता येते..तो एकदा लागला की मग रोखता येत नाही याचे भान सर्वांनीच बाळगण्याची गरज आहे.