यंत्रमाग कारखाने बंद पडण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 11:42 PM2018-10-28T23:42:42+5:302018-10-28T23:42:46+5:30
इचलकरंजी : आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकलेला यंत्रमाग उद्योजक सूत दलालांच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकला आहे. जाळ्यात फसलेल्या उद्योजकांचे यंत्रमाग कारखाने ...
इचलकरंजी : आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकलेला यंत्रमाग उद्योजक सूत दलालांच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकला आहे. जाळ्यात फसलेल्या उद्योजकांचे यंत्रमाग कारखाने दीपावलीनंतर बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, सूत दलाल उमेश खोचगे प्रकरणातील फसवणुकीचा आकडा पाच कोटीपर्यंत गेला असताना आणखीन एक सूत दलालाने त्याच पद्धतीने फसवणूक केल्याचे प्रकरण उदयास येत आहे. त्याची व्याप्तीसुद्धा एक कोटी असल्याची चर्चा आहे.
गेली तीन वर्षे यंत्रमाग उद्योग मंदीतून मार्गक्रमण करीत आहे. अशा परिस्थितीत नोटाबंदी व जीएसटीने या उद्योगामध्ये आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून यंत्रमाग कापडाची निर्मिती ५० टक्क्यावर आली आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाने योग्य ती उपाययोजना करावी. तसेच यंत्रमाग उद्योगासाठी वीज दर सवलत, यंत्रमागधारकाने घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात सूट अशा प्रकारचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राज्यातील सर्वच यंत्रमाग केंद्रांतून होत आहे. मात्र, सरकारने याकडे फारसे लक्ष दिले नसल्याने यंत्रमाग उद्योग रखडला आहे.
आर्थिक टंचाईच्या स्थितीतून जात असतानाच यंत्रमाग उद्योजकांनी अत्यंत काटकसरीने कारखाने सुरू ठेवले आहेत. कापड उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सुताची खरेदी सूत व्यापाºयांकडून केली जाते. विश्वासाने होत असलेल्या या व्यवहारामध्ये यंत्रमागधारक व व्यापारी यांच्यातील दुवा म्हणून दलाल कार्यरत असतो. मात्र, खोचगे प्रकरणामध्ये अशा विश्वासालाच टांग लावून यंत्रमागधारक आणि त्यापाठोपाठ सूत व्यापाºयांचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून हे प्रकरण येथील बाजारामध्ये गाजत आहे. त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असल्याने यंत्रमाग उद्योजकांमध्ये घबराट पसरली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात आतापर्यंत सापडलेल्या यंत्रमागधारकांनी तर हाय खाल्ली असून, पैशाअभावी त्यांचे कारखाने दिवाळीनंतरच सुरूच होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. यापाठोपाठ आता आणखीन एक सूत दलालाने अशाच प्रकारे एक कोटीच्या व्यवहारात अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस येऊ लागले आहे. त्यामुळे दलालांच्या फसवणुकीच्या प्रकरणांची येथील सूत बाजारात जोरदार चर्चा आहे.
पोलिसांची दिवाळीपूर्वी ‘दिवाळी’
सूत दलालाच्या फसवणूक प्रकरणात अनेक यंत्रमागधारकांची नावे गोवण्याचा धंदा पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे. अशा बनावट प्रकरणात अडकविण्यात आलेल्या यंत्रमागधारकाच्या सोडवणुकीसाठी ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करून त्यांना क्लीन चिट दिली जात आहे. यात मात्र पोलिसांचे उखळ पांढरे झाले असल्याची जोरदार चर्चा आहे. दिवाळीपूर्वीच ‘दिवाळी’ सुरू असल्याचे बोलले जात आहे.