लसीकरण चौकशीच्या धास्तीने कोरवी यांनी संपवली जीवनयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:34+5:302021-07-07T04:29:34+5:30
अतिग्रे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरणामध्ये स्थानिक पदाधिकारी आणि केंद्राच्या डॉक्टरांनी आरोग्य विभागाची परवानगी नसताना १८ ते ...
अतिग्रे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू असलेल्या कोरोना लसीकरणामध्ये स्थानिक पदाधिकारी आणि केंद्राच्या डॉक्टरांनी आरोग्य विभागाची परवानगी नसताना १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण केले. याचा वरिष्ठाकडून नाहक त्रास आरोग्य सेवक यांना सहन करावा लागल्याने रमेश कोरवी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
उपकेंद्राकडे लसीकरणाचे ऑनलाईन नोंदणीचे काम आरोग्य सेवक रमेश कोरवी करत होते. परवानगी नसताना झालेल्या लसीकरणाचा त्रास त्यांना हेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वरिष्ठ आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून दिला जात होता. त्यामुळेच आरोग्य सेवक रमेश कोरवी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.
अतिग्रे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये अतिग्रे आणि मौजे मुडशिंगी या दोन गावांतील कोरोना लसीकरण सुरू आहे. उपकेंद्राकडे नियमित ५० नागरिकांचे लसीकरण होत असते. हेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळणाऱ्या लसीकरण व्हायलमधून लसीकरण करणारे डॉक्टर आणि कर्मचारी पाच लसींची बचत करत होते. ही लस डॉक्टर, ग्रामपंचायत पदाधिकारी, लसीकरण करणारे कर्मचारी आपल्या मर्जीतील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकाना देत होते. यावरून उपकेंद्रावर वादावादीचे प्रसंग घडत होते. वशिलेबाजीने लसीकरण केले जात असल्याच्या तक्रारीही झाल्या होत्या.
आरोग्य विभागाच्या ऑनलाईन आणि उपकेंद्राकडील रजिस्टरवरील नोंदणीचे काम आरोग्य सेवक रमेश कोरवी करत होते. त्यांना गावातील कॉम्प्युटर डाटा ऑपरेटर मदत करत होते. लसीकरणासाठी शासन आणि आरोग्य विभागाकडून ४५ वर्षांवरील नागरिकाना पहिला आणि दुसरा डोस देण्याची सक्त सूचना होती. यासाठी नियमित ५० लसींचा डोस पुरवठा केला जात होता. १८ ते ४४ वयोगटासाठी लस उपलब्ध नसताना वशिलेबाजीने लस दिली जात होती. याचा ठपका आरोग्य सेवक रमेश कोरवी यांच्यावर हेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वरिष्ठाकडून ठेवला जात होता.
........
चौकशी करा
शासन आणि आरोग्य विभागाची परवानगी नसताना १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झाले कसे याची उपकेंद्राकडील रजिस्टर तपासणी करून चौकशी होणे गरजेचे आहे. अशी लस घेतलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांवर आरोग्य विभागाने गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.
.....
लेखी हमी
आरोग्य सेवक रमेश कोरवी यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने हातकणंगले पोलिसानी कारवाईची लेखी हमी दिल्यानंतरच मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले.