मुलींच्या फी माफीचा आदेश कधी निघणार?; चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:26 PM2024-06-21T12:26:33+5:302024-06-21T12:27:40+5:30
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही महिना आहे. त्याआधीच शासन आदेश निघेल, असंही ते म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यात भूसंपादन होणार नाही. हा विषय संपला असल्याची घोषणा भाजप नेते उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केली. मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाच्या फी माफीबद्दलचा शासन आदेश पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर निघेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी मंत्री पाटील कोल्हापुरात आले आहेत. ते म्हणाले, शक्तिपीठाबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला असून, त्यासाठी भूसंपादन होणार नाही. तो विषय आता संपला आहे. आता काही जण आंदोलन सुरूच ठेवत आहेत. त्याला काय करणार. मुलींच्या व्यावसायिक फी माफीचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु कोकण पदवीधर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शासन आदेश निघू शकला नाही. तसेही या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना अजूनही महिना आहे. त्याआधीच शासन आदेश निघेल.
रक्तसंबंध आणि सगेसोयरे एकच
मराठा आरक्षणाबाबत मंत्री पाटील म्हणाले, पहिल्यांदा हे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिले; परंतु ते न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर आधीच्या त्रुटी सुधारून दहा टक्के आरक्षण दिले गेलेे; पण शरद पवार हे ५० वर्षे राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू होते. तेव्हा मराठा आरक्षण का दिले नाही. रक्तसंबंध व सगेसोयरे यात काहीही फरक नाही, हे जरांगे पाटील यांना पटवून दिले पाहिजे. समाजाचं भलं कशात आहे, हे त्यांनी पाहिलं पाहिजे.