अभिप्राय १० मार्चपर्यंत द्या
By admin | Published: February 18, 2016 11:48 PM2016-02-18T23:48:41+5:302016-02-19T00:20:32+5:30
प्रादेशिक आराखडा : विभागीय आयुक्तांच्या सूचना; आराखडा वास्तवदर्शी असावा
कोल्हापूर : कोल्हापूरचा प्रादेशिक आराखडा हा वास्तवदर्र्शी असावा, तो तयार करण्यासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाने स्थापन केलेल्या विविध अभ्यासगटांकडून आलेल्या शिफारशींवर संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांनी आपले अभिप्राय १० मार्चपर्यंत सादर करावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी गुरुवारी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी अविनाश सुभेदार, नगररचना विभागाचे पुणे येथील सहसंचालक प्र. ग. भुग्ते, उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे, नगररचना विभागाचे उपसंचालक
मो. र. खान, विनायक रेवणकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर प्रदेशच्या पुढील २० वर्षांच्या विकासाचा साकल्याने विचार करून समितीने सुचविलेल्या शिफारशींवर सकारात्मक पण वास्तवदर्र्शी अभिप्राय अंमलबजावणी यंत्रणांनी द्यावेत, त्यासाठी यंत्रणांनी परस्परांशी समन्वय राखावा,
अशा सूचना चोक्कलिंगम यांनी यावेळी दिल्या. रेल्वेमार्गाशी संबंधित विषयांवर आवश्यकता भासल्यास रेल्वेच्या मुख्य अभियंत्यांबरोबर
पुणे येथे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येतील, तसेच कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबत रेल्वे विभागाने पत्र दिल्यास त्याचा समावेशही प्रादेशिक आराखड्यात करण्यात येईल, असेही त्यांनी
स्पष्ट केले.
बैठकीमध्ये वाहतूक, परिवहन व दळणवळण, शेती, पाटबंधारे, व्यापार, वाणिज्य, उद्योग विकास, ग्रामीण विकास, जमीन वापर, विकास नियमन व विकास नियंत्रण नियमावली, आदी विविध अभ्यास गट असून, या अभ्यास गटांनी आपल्या शिफारशी कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळासमोर सादर केल्या. ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांनी पंचगंगा नदी प्रदूषणविरहित व प्रवाही राहणे आवश्यक असल्याचे सांगून, कोल्हापूर शहर पंचगंगेच्या प्रदूषणामुळे काविळीच्या प्रभावाखाली आहे यावर नियोजनबद्ध व कायमस्वरूपी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रादेशिक नियोजन मंडळाच्या विविध अभ्यास गटांचे सदस्य, अधिकारी, विविध खातेप्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर-गोवा नवीन रस्त्याबाबत चर्चा
यावेळी कोल्हापूर ते गोवा अंतर ४० किलोमीटरने वाचविणारा नवीन प्रस्तावित रस्ता, कऱ्हाड-बेळगाव नवीन रस्त्याची प्रस्तावित आखणी, मुदत संपत आलेल्या सदस्यांची मुदतवाढ, कोल्हापूर-इचलकरंजी प्रादेशिक योजनेतील प्रादेशिक उद्यान प्रस्ताव, हातकणंगले व शिरोळ येथे टेक्साईल हब निर्मिती व त्यासाठी आवश्यक सुविधा, कोल्हापूर शहराला नवीन बाह्यवळण रस्ते, ट्रक टर्मिनन्स, आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. (प्रतिनिधी)