अस्वस्थ काळाच्या मुक्या संवेदना - भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:34+5:302021-09-27T04:27:34+5:30
माहुली/कवठेमहांकाळ झोपडीच्या बाहेर आक्का राशीन दुकानात मिळाल्यालं तांदूळ निवडत बसली हुती. जवळच डोक्याला हात लावून रामा भावजी शून्यात ...
माहुली/कवठेमहांकाळ
झोपडीच्या बाहेर आक्का राशीन दुकानात मिळाल्यालं तांदूळ निवडत बसली हुती. जवळच डोक्याला हात लावून रामा भावजी शून्यात बघत बसल्यालं हुतं. चार-पाच कोंबड्या कुर्रु - कुर्र करत तांदळाच्या भगुल्याजवळणं हिकडून तिकडं नि तिकडून हिकडं करत हुत्या. दाव्यानं खुटीला बांधलेली राणी कुत्री उगाच मधून-अधून कुई-कुई करत हुती. रामा भावजी वल्या करंजाची फोक हाताता घिऊन कोंबड्यांना हाकलत हुतं. मधीच कोंबड्यांना काय-बाय बोलत हुतं. जवळच चाऱ्याविना पोट आत गेलेल्या म्हशीच्या थानाला रिडकू चिटत हुतं. थोरल्या लेकाची लहानगी दोन पोरं आक्काच्या जवळच खेळत हुती. मोठी सून आरोग्य सेविका असल्यामुळं गावात नि वाड्या वस्तीवर कोरोना रुग्णांचा सर्व्हे कराला गेल्याली. मोठ्या लेकाला इंदिरा आवासचं घरकुल मिळाल्यालं. त्याच्या शेजारी मधल्या आक्काच्या दुकानदार असलेल्या मुलानं पत्र्याच्या दोन खोल्या बांधलेल्या. त्याला लागूनच एक जनावराचा गोठा .त्या गोठ्याच्या एका कोपऱ्याला तिनं आपला संसार मांडल्याला.
आक्का आमच्या घरात सगळ्यात मोठी.
मला कळायच्या अगुदरच तिचं लग्न झाल्यालं. तिला तीन मुली नि दोन मुलगं. सगळ्यांची लग्न होऊन ज्याच्या त्याच्या घरात सुखी .मी आक्काचा धाकटा भाऊ. मधून अधून जमल तसं तिला भेटायला गेलो. आक्का नि भाऊजी सुखावून जायची. कुठं ठिव नि कुठं नको, बहीण म्हणून माया करायची; पण आता ती थकली हुती. काम करतानाची उमेद मात्र पहिल्यासारखी तशीच हुती. पण आजची वेळ तिच्या भेटीची येगळीच हुती. डोक्यावर सूर्य आल्ता. तिनं निबर उनापासून डोकं शाबूत राहावं म्हणून डोक्यावर फाटका टाॅवेल ठेवल्याला, कपाळावराचा कुंकू लालबुंद दिसत हुता नि सारं नाक घामामुळं कुंकवानं लालेलाल झाल्यालं. मी सोबत राशिन नि किराना तिला द्यायला घेऊन गेल्तू. मधून अधून बहीण म्हणून जाताना मनात किंतु परंतु कधीच नसायचा; पण आज मात्र मन सैरभैर झाल्यालं हुतं नि काळीज धडधडत हुतं. माय गेल्यापास्न माझ्या आधाराची काठी व्हवून मला साथ द्यायची. आज तिला मी आधार द्यायला मन घट्ट करून आलू व्हतू. तिचा वकुत फिरला हुता. सारी भयाण शांती तिच्या नि झोपडीच्या भवती गरगर फिरत असल्याचा सतत भास होत हुता. तिला आधार द्यायला तोंडातून शब्द बाहेर पडता पडेना.
मी नुस्ता तिच्याकडं नि भावजीकडं मुक्या नजरनं बघत उभा राहिल्यालू. काय करावं काहीच कळत नव्हतं. तिघांचाबी शब्द फुटना. मी काय करावं नि काय बोलावं, कायबी मला कळना. येरवी मी आलूया म्हटलं की आनंदानं हसणारं भावजी आज नजरेनं नि तोंडानं मुकं झालं हुतं. तीच परिस्थिती माझी नि आक्काची झाल्याली. त्यांचा आनंद आता कुठच दिसत नव्हता. कानावर कुणाचा कुणाला शब्द पडता पडेना. सारा भवताल मुका नि बहिरा झाला हुता; पण तिघांचा मूक संवाद हुता-हुता भावजी कसंबसं सावरत कडकड वाजणाऱ्या गुडग्याला सावरत हातात काठी घिऊन उठताना पडत्याल म्हणून मी सरकलू आधारासाठी, तर येरवी पहाडासारखं खंबीर आसल्यालं भावजी हांबरडा फोडून रडू लागलं. नि आता कुणाचा आधार नकू मला. मला माझं प्वार कुणी देईल का...? त्या कुरुणाला कुणी पेटवील का...? माझ्या लेकरानं कुणाचं कायबी वाटूळं केलं नव्हतं. मग आमाला वाऱ्यावर सोडून माझं तरणं ताटं प्वार कुणी ओ न्हेलं.....
असं म्हणून रडताना माझा हुंदका मी थांबवू शकत नव्हतू, तरी हुंदका सावरत भावजीला धीर देताना माझ्या पायाखालची माती सरकत हुती. जवळच बाजूला सरून बसल्याली आक्का इतका वेळ गप्प राहिल्याली. तिचा हुंदका गावाची वेस ओलांडून कधीचाच गेल्याला. घरातला नि दारातला आनंद त्यांना सोडून परागंदा झालाय, मग आनंद परत कुठून येणार.
नुकतेच आठ-दहा दिवस झाल्यालं आनंदा दुकानाकडंच कोरोनानं गेल्याला. ऐन तिशीतलं लेकरू जगण्याचं जिंकलेलं मैदान हारून जाताना मायच्या नि बापाच्या काळजाचं पाणी-पाणी झालं होतं. तरणीताठी घरात सून कपाळमोक्ष होऊन हवालदिल झाल्याली. बाप कुठंच दिसंना म्हणून बापाच्या आठवणीनं तीन वर्षांचं बाळ नि पाच वर्षांची मुलगी सैरभैर होऊन मायच्या कुशीत रडून रडून तशीच झोपल्याली.