रेशनकार्डवर महिला कुटुुंबप्रमुख

By admin | Published: October 9, 2015 12:52 AM2015-10-09T00:52:59+5:302015-10-09T01:13:00+5:30

नववर्षात मिळणार स्मार्ट कार्ड : आतापर्यंत पाच लाख ४१ हजार कार्डांचे काम पूर्ण

Female family chief on ration card | रेशनकार्डवर महिला कुटुुंबप्रमुख

रेशनकार्डवर महिला कुटुुंबप्रमुख

Next

प्रवीण देसाई --कोल्हापूर रेशनकार्डवर आता महिला कुटुंबप्रमुख होणार आहे. तिचे छायाचित्र असलेले स्मार्ट कार्ड (रेशनकार्ड) नववर्षात कार्डधारकांच्या हातात पडणार आहे. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत आठ लाख ४९ हजार २१६ पैकी पाच लाख ४१ हजार ९१८ रेशनकार्डांचे काम पूर्ण झाले असून, त्यावर महिलांचे कुटुंबप्रमुख म्हणून नाव नोंदविण्यात आले आहे. उर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे.
घरातील कर्ता पुरुष या नात्याने कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचे नाव आतापर्यंत रेशनकार्डवर होते. परंतु, आता या रेशनकार्डवर घरातील प्रथम महिला कुटुंबप्रमुख म्हणून दिसणार आहे. त्यामुळे रेशनकार्डवरील इतर सदस्यांची नावे पती, मुलगा, सून अशी नोंदविली जातील. जुलै महिन्यापासून जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू केली आहे. पूर्वी महसूल व पुरवठा विभागाच्या माध्यमातून काम सुरू होते. आता त्यांच्या मदतीला अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स आल्या आहेत. त्यांना प्रति कार्डमागे पाच रुपये मोबदला दिला जाणार आहे. शहरासह ग्रामीण भागात त्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. घराघरांत जाऊन त्या संबंधितांकडून प्री-प्रिंटेड फॉर्म भरून घेत आहेत. या फॉर्ममध्ये कुटुंबप्रमुख महिलेचे नाव, निवासी पत्ता, गावाचे नाव, शहराचे नाव, रेशन दुकानाचे नाव, आधारकार्ड क्रमांक, वार्षिक उत्पन्न, आदी माहिती भरून घेतली जात आहे. यानंतर हे प्रिंटेड फॉर्म जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशनकार्ड संगणकीकरणाचा ठेका मिळालेल्या क्लिक सॉफ्ट एजन्सीकडे पाठविले जात आहेत. तेथे तीनशेहून अधिक डाटा आॅपरेटर ही माहिती संकलित करून त्यांची एंट्री करत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. आतापर्यंत काम पूर्ण झालेली टक्केवारी ६३.८१ इतकी आहे.
गेल्या तीन महिन्यांत पाच लाख ४१ हजार ९१८ इतक्या रेशनकार्डांवर महिलांचे नाव कुटुंबप्रमुख म्हणून नोंदविण्यात आले आहे. उर्वरित तीन लाख सात हजार २९८ रेशनकार्डांचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्याचा पुरवठा विभागाचा प्रयत्न आहे. त्यामुळे नववर्षात महिला कुटुंबप्रमुख म्हणून नोंद असलेले हे रेशनकार्ड मिळण्याची शक्यता आहे.

हे काम युद्धपातळीवर सुरू असून, जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन याचा पाठपुरावा केला जात आहे. महसूल, पुरवठा यंत्रणेसह रेशन दुकानदार, अंगणवाडी सेविका, महिला बालकल्याण अधिकारी यांच्या संयुक्त बैठका घेऊन सूचना दिल्या जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू असून, लवकरच हे काम पूर्ण होईल.
- विवेक आगवणे,
जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Female family chief on ration card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.