सानेगुरुजी वसाहतीतील महिला जिम रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:19 AM2020-12-08T04:19:53+5:302020-12-08T04:19:53+5:30
अमर पाटील कळंबा : आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांना शारीरिक व्यायामासह मानसिक विरंगुळा प्राप्त व्हावा यासाठी प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत ...
अमर पाटील
कळंबा : आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीत महिलांना शारीरिक व्यायामासह मानसिक विरंगुळा प्राप्त व्हावा यासाठी प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत येथील गट नंबर १०७१अ सूर्यवंशी कॉलनी येथे प्रशस्त महिला जिमची उभारणी करण्यात आली खरी; परंतु मंजूर ४३ लाखांचा निधी फक्त इमारत उभी करण्यात खर्ची पडल्याने गेली चार वर्षे निव्वळ निधीअभावी जिममध्ये व्यायामाचे साहित्य खरेदी व अन्य कामे रखडली आहेत. निधीअभावी या आगळ्यावेगळ्या महिला जिमचे काम पूर्णत्वास जाणार कधी, हा प्रश्न उपनगरात महिलांसह युवतींना सतावत आहे.
२०१३ साली पालिका प्रशासनास १० कोटींचा विशेष विकासनिधी मिळाला होता. प्रभागाचे त्यावेळचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी ४३ लाखांचा निधी प्रभागात महिला जिम उभारण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला. २०१४ मध्ये प्रशासनाची त्यास तांत्रिक मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामास २०१५ मध्ये सुरुवात झाली. एक वर्षांत पूर्णत्वास जाणाऱ्या जिमची निव्वळ इमारत उभारण्यात ४३ लाख खर्ची पडले.
दरवाजे, खिडक्या, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृहे ही कामे प्रलंबित राहिली आहेत, यामधील जिममध्ये व्यायामाची प्रेशर वाॅकर, चेस्ट प्रेशर, सायकलिंग, पुलीज, डंबेल्स, एबडॉमिनल, बेंच व अन्य साधने बसविण्यात येणार होती. इमारतीबाहेर ओपन जिम, बगीचा व विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार होते.
दरम्यान, या प्रभागातुन भाजपच्या मनीषा कुंभार निवडून आल्या, तर पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता, त्यामुळे निधीच्या राजकारणात जिमचे काम रखडले. आज निधीअभावी इमारतीची दुरवस्था होत आहे.
उपनगरात आधुनिक जिमचे दर परवडत नाहीत, शिवाय महिलांना संकोचल्यासारखे होते. स्वतंत्र महिलांची जिम विकसित झाल्यास महिलांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी या कामी लक्ष घालून प्रश्न मार्गी लावावा, ही मागणी जोर धरत आहे.
निव्वळ निधी वाटपातील दुजाभावाने हे काम राखडले आहे. पालिका प्रशासन निधी उपलब्ध करून देण्यास असमर्थ असेल, तर खासगी तत्त्वावर प्रशासनाने काम पूर्ण करावे.
- मनीषा कुंभार, नगरसेविका
फोटो ओळ - प्रभाग ७४ सानेगुरुजी वसाहत येथील महिला जिमचे काम निव्वळ निधीअभावी चार वर्षे रखडले असून, इमारतीची दुरवस्था झाली आहे.