हलकर्णी येथे स्त्री जातीचे अर्भक सापडले, कोल्हापूरच्या शिशुगृहात पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:36 IST2025-02-21T13:35:40+5:302025-02-21T13:36:38+5:30
दैव बलवत्तर म्हणूनच परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असूनही ‘ती’ सुरक्षित सापडली.

हलकर्णी येथे स्त्री जातीचे अर्भक सापडले, कोल्हापूरच्या शिशुगृहात पाठवले
हलकर्णी : येथील मुंगूरवाडी यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळील बोळात गुरुवारी पहाटे स्त्री जातीचे नवजात अर्भक प्लास्टिक पिशवीमध्ये सापडले. त्यामुळे हलकर्णी पंचक्रोशीत खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नवजात अर्भकाला कोल्हापूर येथील शिशूगृहात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास नितीन मुंगूरवाडी यांच्या जनावरांच्या पत्र्याच्या गोठ्यालगत असणाऱ्या बोळात बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे शेजारी राहणारे राजेंद्र नावलगी यांनी जाऊन पाहिले असता प्लस्टिक पिशवीत अर्भक आढळून आले. पाठीला मुंग्या लागल्यामुळे ते रडत होते.
सरपंच योगिता संगाज यांनी त्या अर्भकाला हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांनी प्राथमिक तपासणी करून अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविले. तेथून त्याला शिशुगृहात पाठवण्यात आले. दरम्यान, सरपंच संगाज यांच्यासह असगर बागवान, रामा सुतार, महावीर वड्राळे आदींनी अर्भकाची काळजी घेतली. राजेंद्र नावलगी यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
गोंडस अर्भक सुखरूप!
२ किलो ७०० ग्रॅम वजनाचे अर्भक गोंडस व सुखरूप आहे. नाळेसह प्लास्टिक पिशवीत घालून उताणे झोपवल्यामुळे पाठीला मुंग्या लागून ते रडत होते. लता वड्राळे, संगीता नावलगी, परवीन पानारी, दीपा चिटणीस यांनी तत्काळ अंघोळ घालून मधाचे बोट चाटवले. त्यानंतर अर्भकाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आले.
‘तिचे’ नशीबच बलवत्तर..!
कदाचित मुलगी झाली म्हणूनच तिला असे टाकून देण्यात आले होते. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असूनही ‘ती’ सुरक्षित सापडली. अर्भकाच्या मातेसह तिला टाकून देणा-या अज्ञातांचा पोलिस शोध घेत आहेत.
पालनपोषणासाठी दाम्पत्य पुढे
मुंगुरवाडीतील नीलेश व दीपा चिटणीस या दाम्पत्याने ‘त्या’ अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.