कोल्हापुरात महिला पोलिस उपनिरीक्षकास सराईत गुन्हेगाराकडून धक्काबुक्की, संशयित सूरज नलवडे याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 01:39 PM2024-09-10T13:39:02+5:302024-09-10T13:40:07+5:30

गणेश आगमन मिरवणुकीतील प्रकार 

Female police sub-inspector assaulted by criminal in Sarai during Ganesh arrival procession in Kolhapur | कोल्हापुरात महिला पोलिस उपनिरीक्षकास सराईत गुन्हेगाराकडून धक्काबुक्की, संशयित सूरज नलवडे याला अटक

कोल्हापुरात महिला पोलिस उपनिरीक्षकास सराईत गुन्हेगाराकडून धक्काबुक्की, संशयित सूरज नलवडे याला अटक

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत जनता बाजार चौकातून पुढे जाण्यास सांगितल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार सूरज तानाजी नलवडे (वय ३३, रा. शाहूनगर, कोल्हापूर) याने पोलिस उपनिरीक्षक रूपाली भीमराव पवार यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना शनिवारी (दि. ७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत उपनिरीक्षक पवार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी नलवडे याला अटक केली.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागात नियुक्ती असलेल्या उपनिरीक्षक पवार या सहकाऱ्यांसह जनता बाजार चौकात बंदोबस्तासाठी तैनात होत्या. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कीर्ती तालीम मंडळाचा गणपती मिरवणुकीतून जनता बाजार चौकात पोहोचला. बराच वेळ एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मंडळांना पुढे सरकण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात होत्या. त्यावेळी उपनिरीक्षक पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वाहन पुढे घेण्यास सांगितले.

याचा राग आल्याने सराईत गुन्हेगार सूरज नलवडे याने पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घातला. 'असले पोलिस अधिकारी लय बघितलेत. मी पुढे जात नाही. काय करायचं ते करा,' असे म्हणत त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या अंगावर हात उगारल्याबद्दल उपनिरीक्षक पवार यांनी नलवडे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली.

Web Title: Female police sub-inspector assaulted by criminal in Sarai during Ganesh arrival procession in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.