पोलीस ठाण्यांत महिला विश्रांती कक्ष
By admin | Published: March 9, 2016 12:25 AM2016-03-09T00:25:29+5:302016-03-09T00:55:44+5:30
प्रदीप देशपांडे : दोन कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर; ‘प्रतिसाद एएसके’ मोबाईल अॅपचे अनावरण
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत महिला विश्रांती कक्ष लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी मंगळवारी सांगितले. ते ‘प्रतिसाद एएसके’ या मोबाईल अॅपच्या अनावरण समारंभप्रसंगी बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, ‘प्रतिसाद मोबाईल अॅप’चे कार्यकारी अध्यक्ष शशांक देशपांडे उपस्थित होते. कसबा बावडा येथील पोलीस कवायत मैदानाजवळील अलंकार हॉल येथे हा समारंभ झाला.
पोलीस अधीक्षक देशपांडे म्हणाले, पोलीस ठाण्यात महिला पोलीसांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन शासनाने अद्ययावत असे विश्रांतीगृह उभारण्यासाठी निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामास सुरुवात केली जाईल.
‘प्रतिसाद एएसके’ या अॅप बद्दल बोलताना ते म्हणाले, राज्यात नांदेड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात्ां हे अॅप सुरू केले आहे. यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास वेळेनुसार त्यात बदल केला जाईल. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या अॅपचे अनावरण केले आहे.
दीपाली काळे म्हणाल्या, आज टीव्हीवरील चित्रपट, मालिका यांमधील बीभत्स प्रदर्शनामुळे दिवसेंदिवस लैंगिक अत्याचार वाढत आहेत. त्यासाठी नैतिक अधिष्ठान असलेला समाज निर्माण केला पाहिजे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या प्रमुख वैष्णवी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, करवीर पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव व पोलीस उपअधीक्षक दिलीप जाधव यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
असे इन्स्टॉल करा ‘प्रतिसाद’
आपल्या मोबाईलमधील ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये जा.
त्यानंतर ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये सर्च आॅपरेशनमध्ये जाऊन प्रतिसाद (एएसके) टाईप करून सर्च करा.
त्यानंतर ‘प्रतिसाद एएसके’ सेलेक्ट करा.
हा अॅप डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड / इन्स्टॉलवर क्लिक करा.
अॅप डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक रजिस्टर करा.
त्यानंतर आपल्याला खाली कोड टाकावा लागणार आहे.