पन्हाळ्यात लाच घेताना हवालदार जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:40 AM2019-06-22T00:40:49+5:302019-06-22T00:40:54+5:30
पन्हाळा : पन्हाळा पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश खुटावळे याला एका अदखलपात्र गुन्ह्यात आरोपीवर कारवाई करण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना ...
पन्हाळा : पन्हाळा पोलीस ठाण्यातील हवालदार सतीश खुटावळे याला एका अदखलपात्र गुन्ह्यात आरोपीवर कारवाई करण्यासाठी दीड हजाराची लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार तुकाराम जानकर (वय २२) व त्याचे चुलते बंडा जानकर यांच्यात शेतजमिनीच्या वादातून ५ जून २०१९ रोजी मारामारी झाली होती. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
आपले चुलते बंडा जानकर यांच्यावर कायदेशीर कारवाई म्हणून तक्रारदार तुकाराम वारंवार हवालदार सतीश खुटावळे यांच्याशी संपर्क साधत होता. खुटावळे याने तक्रारदार तुकारामकडे त्याचे चुलते बंडा जानकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात दीड हजार देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदार याने कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शुक्रवारी सकाळी सतीश खुटावळे याच्या विरोधात तक्रार केली. या तक्रारीची तातडीने दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पन्हाळा पोलीस ठाण्यात सापळा रचून हवालदार खुटावळे याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. खुटावळेवर पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.