मेथी झाली उदंड ! घाऊक बाजारात तीन रुपये पेंढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 04:54 PM2020-11-30T16:54:42+5:302020-11-30T16:57:18+5:30
vegetable, market, kolhapurnews परजिल्ह्यांतील आवकेबरोबरच स्थानिक मेथीची आवक वाढल्याने मेथी मातीमोल दराने विकावी लागत आहे. घाऊक बाजारात पेंढीचा दर तीन रुपये झाला आहे. कडधान्य बाजार एकदम थंड असून कोणत्याही प्रकारचा चढउतार पाहावयास मिळत नाही. फळबाजारात अननस, बोरे, चिक्कू, संत्र्यांची आवक वाढली आहे.
कोल्हापूर : परजिल्ह्यांतील आवकेबरोबरच स्थानिक मेथीची आवक वाढल्याने मेथी मातीमोल दराने विकावी लागत आहे. घाऊक बाजारात पेंढीचा दर तीन रुपये झाला आहे. कडधान्य बाजार एकदम थंड असून कोणत्याही प्रकारचा चढउतार पाहावयास मिळत नाही. फळबाजारात अननस, बोरे, चिक्कू, संत्र्यांची आवक वाढली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मेथीची पेंढी २० रुपयांपर्यंत होती. मात्र स्थानिक शेतकऱ्यांची भाजी बाजारात आल्याने दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. कोल्हापूर बाजार समितीत रविवारी ८९ हजार ८०० पेंढ्यांची आवक झाल्याने दर एकदम खाली आला.
घाऊक बाजारात तीन रुपयांपर्यंत दर खाली आल्याने किरकोळ बाजारात पाच ते सात रुपयांना पेंढी मिळत आहे. पोकळ्याचीही हीच अवस्था असून, पालकाचा दर कायम राहिला आहे. इतर फळभाज्यांच्या दरांतही घसरण झाली आहे. प्रमुख भाज्यांचे किरकोळ दर ४० रुपये किलोपर्यंत आहेत. गवार, हिरवा वाटाणा वगळता एकाही भाजीचा दर ४० रुपयांच्या वर नाही.
दीपावलीनंतर कडधान्यांचा बाजार एकदमच शांत झाला आहे. गेल्या आठवड्यात लाल मिरच्यांची काहीशी मागणी वाढली होती. मात्र गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू असल्याने मागणी एकदमच थांबली आहे. डाळींसह इतर कडधान्यांच्या दरांत फारसा चढउतार दिसत नाही. फळबाजारात बोरे, संत्री, अननस, चिक्कू, डाळींब, सीताफळांची आवक चांगली असून, दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आहेत.
लालभडक गाजरांची आवक
गाजरांची आवक सुरू झाली असून लालभडक गाजरे ग्राहकांना भुरळ घालत आहेत. बाजार समितीत रोज २०० हून अधिक पोत्यांची आवक होत असली तरी दर ५० रुपये किलोपर्यंत आहे.
फ्लॉवरच्या दरात घसरण
मध्यंतरी फ्लॉवरचा दर तेजीत होता. त्याचा एक गड्डा २५ रुपयांपर्यंत होता. मात्र आता मोठा गड्डा १० रुपयांना मिळत आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.