खत उद्योगाचा ‘पिता’
By admin | Published: October 6, 2015 12:04 AM2015-10-06T00:04:13+5:302015-10-06T00:31:21+5:30
कृषिक्रांतीचे शिलेदार
विद्यापीठे व उद्योगधंदे यांनी हातात हात घालून विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य केले तर त्या राष्ट्राची प्रगती गतीने होते. आज भारतातील सर्व विद्यापीठे इनक्युबेशन सेंटर उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. याच विचाराने एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी एक संशोधक प्रयत्नरत होते. त्याकाळी पाव, औषध, वाइनरी तयार करण्यासाठी विद्यापीठे नसून ज्ञानदानासाठी आहेत, असे विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने त्यांना सांगितले होते. मात्र, विद्यापीठातील अध्यापन चालू ठेवून त्यांनी बाहेर हा प्रयोग सुरू ठेवला. कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात आपल्या कार्याने अजरामर झालेले संशोधक म्हणजे जस्टस वोन लिबिंग.
जस्टस यांचा जन्म जर्मनीतील डर्मस्टॅट या गावात १२ मे १८०३ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे हार्डवेअर, रंग साहित्याचे दुकान होते. रंग पाहून लहानपणापासून जस्टस यांना रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली. जस्टस तेरा वर्षांचे असताना युरोपमध्ये सर्वांत मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाचे भयानक परिणाम पाहून जस्टस यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. या परिणामांचे प्रतिबिंब त्यांच्या कार्यात दिसतात.
अभ्यासक्रम पूर्ण न करताच त्यांनी प्रशिक्षण उमेदवारी सुरू केली. त्यांचा खर्च वडिलांना परवडत नसल्याने ते परत आले. वडिलांसह दोन वर्षे काम केले, पुरेसे पैसे जमविले आणि बॉन विद्यापीठात ते रूजू झाले. वडिलांच्या व्यवसायातील साथीदार कार्ल कासनर यांच्यासह अध्ययन सुरू केले. कासनर यांनी बॉन विद्यापीठ सोडले. जस्टस यांनाही विद्यापीठ सोडावे लागले. पुढे त्यांनी इर्लांजन विद्यापीठात प्रवेश घेऊन रसायनशास्त्राचे ज्ञान घेण्यास सुरू केले. तिथे विद्यार्थी चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना विद्यापीठाने काढून टाकले. मात्र, अभ्यासातील प्रगतीमुळे त्यांना पीएच.डी. पूर्ण करण्याची संधी दिली. त्यांना २३ जून १८२३ रोजी इर्लांजन विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. जिसेन विद्यापीठात हंबोल्ट यांच्या सूचनेनुसार विशेष प्राध्यापक म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली. मात्र, तिथे पूर्वीपासून काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांना असहकार सुरू केला. त्यांना प्रयोगशाळा वापरण्यास बंदी घातली व अध्यापनासाठी त्यांना कमी महत्त्वाचे कला शाखेचे विषय दिले. पुढे विरोध करणाऱ्या शिक्षकांपैकी एकाने आत्महत्या केली, तर दुसऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे नियमित प्राध्यापक पदासाठी जस्टस यांनी अर्ज केला व १९२५ मध्ये ते नियमित प्राध्यापक झाले. त्यांचे अध्यापन प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकांच्या आधारे असल्याने संपूर्ण युरोपभर त्यांची ओळख निर्माण झाली. विद्यापीठ व्यवस्थापनाने मात्र त्यांच्या या पद्धतीला विरोध केला. त्यामुळे त्यांनी बाहेर प्रयोगशाळा सुरू केल्या. पुढे दहा वर्षांनंतर जस्टस यांची अध्यापन पद्धती विद्यापीठाने स्वीकारली.
जस्टस यांनी वनस्पतींची वाढ व पोषण या विषयावर संशोधन केले. वनस्पतींच्या वाढीसाठी आॅक्सिजन, हायड्रोजन, कार्बन आणि नायट्रोजन या मूलद्रव्यांचे महत्त्व मोठे आहे. वनस्पतींना पुरेसा नायट्रोजन पुरविण्यासाठी अमोनिया व युरिया महत्त्वपूर्ण आहेत. मात्र, याला प्रायोगिक निष्कर्षाची साथ नव्हती. जस्टस यांनी शेतीत प्रत्यक्ष प्रयोग केले नाहीत. मात्र, प्रयोगशाळेतील वाढ अभ्यासून वनस्पतींना विविध क्षारांची किती मात्रा देणे गरजेचे आहे, जास्त मात्रा दिल्यास काय परिणाम होतो, हे सांगितले. कृत्रिम खतांची मात्रा निश्चित करणाऱ्या या वैज्ञानिकास ‘खत उद्योगाचा पिता’ म्हणतात. त्यांनी पशुपालन आणि मांस व्यवसाय सुरू केला. मांसाची निगा राखण्यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले व लिबिंग मीट कंपनी सुरू केली. १८ एप्रिल १८७३ मध्ये त्यांचे निधन झाले. मात्र, आजही त्यांच्याच रसायनशास्त्र प्रयोगशाळेची रचना अद्ययावत मानली जाते.
- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.