खत वाहतूक भाडेवाढीचा तिढा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:54+5:302021-07-10T04:17:54+5:30
कोल्हापूर : रासायनिक खत वाहतुकीच्या भाडेवाढीच्या संदर्भात कृषी विभागाने शुक्रवारी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली. कंपनी, एस. टी. महामंडळ व ...
कोल्हापूर : रासायनिक खत वाहतुकीच्या भाडेवाढीच्या संदर्भात कृषी विभागाने शुक्रवारी बोलावलेली बैठकही निष्फळ ठरली. कंपनी, एस. टी. महामंडळ व ट्रान्स्पोर्टर यांच्यात भाड्यावरून मतैक्य झाले नाही. अखेर आज शनिवारी पुन्हा एकदा बैठकीस बसण्याचे ठरले.
डिझेलच्या दरात वाढ झाल्याने खत वाहतुकीच्या भाड्यात किमान १० ते १२ टक्के वाढ करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील ट्रान्स्पोर्ट युनियन संपावर आहे. गेल्या नऊ दिवसांपासून हा संप असल्याने जिल्ह्यात खत पुरवठा ठप्प झाला आहे. ऐन खरिपात शेतकऱ्यांची खताअभावी अडचण होत असल्याने जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने यात पुढाकार घेऊन कंपनी, ट्रान्स्पोर्टर व पर्यायी वाहतूक म्हणून एस. टी. महामंडळाच्या प्रतिनिधींची बैठक शुक्रवारी बोलावली होती.
या बैठकीत ट्रान्स्पोर्ट युनियन १० टक्के वाढीवर अडून बसली आहे, तर खत कंपन्याही ३ ते ५ टक्केतच वाढ देण्यावर ठाम आहे. एस. टी. महामंडळाकडे एकूण वाहतुकीच्या २५ टक्केचा प्रस्ताव होता, पण प्रत्यक्षात बैठकीला बसल्यानंतर कंपन्यांकडून एवढा दर देणार नसल्यासे सांगण्यात आल्याने एस. टी. महामंडळाने कमी दरात वाहतूक करणे परवडत नसल्याचे सांगत यातून माघार घेतली.
आता पुन्हा एकदा ट्रान्स्पोर्ट युनियन आणि खत कंपन्यांना एकत्रित बोलावण्याचे ठरले. त्यानुसार दोघांनीही दोन दोन पाऊले मागे येऊन हा तिढा सोडवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी झानदेव वाकुरे यांनी केले. त्यानुसार आज होणाऱ्या बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचे प्रयत्न होणार नाही. तरीदेखील काही निर्णय झाला नाही, तर मात्र कृषी आयुक्तस्तराकडून मार्गदर्शन मागवण्याचे नियोजन आहे.
चौकट
पिकांना खतांची गरज
आता पाऊस सुरू झाल्याने आणि खरीप पिकांना महिनाभराचा कालावधी झाल्याने खतांचा पहिला डोस देण्याची गरज आहे. असे असताना भाडेवाढीच्या कारणास्तव कंपन्या व वाहतूकदारांकडून शेतकऱ्यांच्याच अडवणुकीचे काम होत आहे. आधीच पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. आता खते दिल्याशिवाय पीक तरारणार नाही, यातून तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे.