प्रकाशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 07:55 PM2017-10-14T19:55:34+5:302017-10-14T20:02:56+5:30

‘सण दिवाळीचा मोठा, नाही आनंदाला तोटा...’ अशा या दिवाळी उत्सवाला  सोमवारी वसुबारसने सुरुवात होणार आहे. दिवाळीचा सण हा यंदा सहा दिवस रंगणार असून, उत्सवप्रेमी नागरिकांसाठी ही पर्वणीच असणार आहे.

The festival begins from tomorrow | प्रकाशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात

प्रकाशोत्सवाला सोमवारपासून सुरुवात

Next
ठळक मुद्देसहा दिवस रंगणार उत्सव नात्याचावर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त फराळाचा सुटला दरवळ

कोल्हापूर, दि. १४ : ‘सण दिवाळीचा मोठा, नाही आनंदाला तोटा...’ अशा या दिवाळी उत्सवाला  सोमवारी वसुबारसने सुरुवात होणार आहे. दिवाळीचा सण हा यंदा सहा दिवस रंगणार असून, उत्सवप्रेमी नागरिकांसाठी ही पर्वणीच असणार आहे.


आपल्या आयुष्यातील ताण-तणाव, चिंता, संघर्ष विसरायला लावणारा, पणत्यांचा शीतल प्रकाश, आकाशकंदील, विद्युत माळांच्या आकर्षक रोषणाईने घरादाराला उजळून टाकणाऱ्या या दिवाळी सणाचे ‘वर्षातला सर्वांत मोठा सण’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंध:काराचा नाश करीत घरोघरी समृद्धता, आनंद, मांगल्याची शिदोरी घेऊन येणाऱ्या या सणात धार्मिक, सांस्कृतिक विधी असतात.

वसुबारस या शेती संस्कृती आणि बळिराजाविषयी आदर व्यक्त करणाऱ्या दिवसापासून ते धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सहा दिवसांभोवती दिवाळीचे महत्त्व अधोरेखित होते. गतवर्षीप्रमाणे यंदादेखील ही दिवाळी तब्बल सहा दिवसांची आहे. त्यामुळे उत्सवाचा अधिक आनंद घेता येईल. सणाच्या निमित्ताने आता घरोघरी बनविल्या जाणाऱ्या फराळाचा दरवळ सुटला आहे.


सोमवारपासून वसुबारसने या सणाची औपचारिक सुरुवात होणार आहे. पीक उगवणारी माती, शेतात राबणारा शेतकरी आणि त्यांच्याबरोबरीने काम करणारे बैल, दूधदुभतं देणारी गाय, म्हशी या मुक्या प्राण्यांविषयीचा आदर आणि प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजे वसुबारस. हा सण मुख्यत्वे ग्रामीण भागात साजरा केला जातो.

मंगळवारी (दि. १७) धनत्रयोदशी असून, हा दिवस आरोग्य देवता धन्वंतरीच्या पूजनाने साजरा केला जातो. या दिवशी ‘यमदीप दान’केले जाते. आणि सायंकाळी व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीची कुबेर-विष्णूसह पूजा केली जाते. दागिने, हिशेबाच्या वह्या, चोपड्या यांची साळीच्या लाह्या, बत्तासे, धण्याच्या अक्षता, झेंडूच्या फुलांनी पूजा करतात. नंतर रोषणाई, फटाके, प्रसाद वाटप हा सोहळा असतो. बुधवारी (दि. १८) नरकचतुर्दशी असून, हा सणाचा पहिला दिवस मानला जातो. यादिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक तेल, उटण्याने अभ्यंगस्नान केले जाते.

नवी वस्त्रप्रावरणे नेसून लोक देवदर्शनासाठी जातात. दीपोत्सवाच्या शुभेच्छा, फराळाचा आस्वाद, आतषबाजीचा आनंद सर्वजण लुटतात. गुरुवारी (दि. १९) लक्ष्मीपूजन असून, या अमावास्येला सायंकाळी घरी व व्यापार-उद्योगाच्या ठिकाणी लक्ष्मी-कुबेराची पूजा केली जाते. पूजेसाठी धणे, बत्तासे, झेंडूची फुले, नैवेद्याला पेढे, लाडू असा रिवाज आहे. या लक्ष्मीदेवतेकडे सर्वजण समृद्धी, ऐश्वर्य, भरभराटीसाठी प्रार्थना करतात.


वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला दिवाळी पाडवा शुक्रवारी (दि. २०) असून, हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणून ओळखला जातो. पती-पत्नीच्या नात्याचा गोडवा वाढविणारा, माहेरी आलेल्या मुली, जावयाच्या कौतुकाचा हा दिवस. शनिवारी (दि. २१)भाऊबीज(यमद्वितिया)असून, या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते. बहीण गोडधोड पक्वान्न करून भावाला जेवू घालते. यानिमित्ताने भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो. तसेच सासुरवाशीण माहेरी येतात.
 

 

Web Title: The festival begins from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :diwaliदिवाळी