सण आला अन् पैसे अडकले, ग्राहक चिंतातूर; पी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:56 AM2019-09-27T11:56:41+5:302019-09-27T11:59:31+5:30
दसऱ्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने बँकेच्या सर्वसामान्यांना सणासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे.
कोल्हापूर : दसऱ्याच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅप. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध घातल्याने बँकेच्या सर्वसामान्यांना सणासाठी लागणारा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न पडला आहे.
आठवडाभरात दसरा, तर महिनाभरात दिवाळी हा मोठा सण येत आहे. या दोन सणांना हिंदु धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने बहुतांशी नागरिक या मुहूर्तावर सोने, चांदीसह काही ना काही वस्तू खरेदी करतात.
दीपावली सणाला तर प्रत्येक अख्या कुटुंबाला नवीन कपडे खरेदी, फराळ तयार केला जातो, तर दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरही नव्या वस्तू खरेदी केल्या जातात. वर्षभरात रिकरिंग, बचत, ठेव अशा स्वरूपात नागरिक पैसा साठवत असतात. या सणाच्या तोंडावर पी. एम. सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने खातेदार असलेल्या नागरिकांचे तोंडचे पाणी पळाले आहे; त्यामुळे अनेक नागरिकांनी योजून ठेवलेल्या कार्य, खरेदी कशी करायची अशी चिंता लागून राहिली आहे.
अनेकांना वैद्यकीय कारणांसाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा असा प्रश्न, तर दरवर्षी जीवन विमा भरण्यासाठी महिन्याला ठरावीक रक्कम बाजूला काढून ती बँकेच्या रिकरिंग ठेवमध्ये ठेवणाऱ्या ग्राहकांना आता विमा हफ्ता कसा भरायचा असा प्रश्न पडला आहे.
जरी सहा महिन्यांनी बँकेवरील निर्बंध उठले तरी आताच्या घडीला खर्च कसा भागवायचा असा प्रश्न अनेक खातेदारांना पडला आहे, अशी चर्चा शहरातील विविध शाखांच्या ग्राहकांमध्ये होती. सहा महिन्यांनंतर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध उठतील आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दिलासा बँकेचे कर्मचारी व अधिकारी ग्राहकांना देतानाचे चित्र बँकेच्या कोल्हापुरातील सर्व शाखांमध्ये दिसत होते.
गेले दोन दिवस सहा महिन्यांत एक हजार रुपये ग्राहकांना दिले जायचे. त्यात गुरुवारपासून १0 हजार इतकी मर्यादा वाढविण्यात आल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होती. विशेषत: महिला ग्राहकांच्या चेहऱ्यांवर चिंता अधिक दिसत होती.
बँकेची शाखा जवळ असल्याने गेले कित्येक वर्षे येथे व्यवहार करीत होतो; मात्र रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे खात्यातील पैसे अडकले; त्यामुळे व्यवसायाचे चक्र कसे फिरवायचे असा प्रश्न पडला आहे.
डी. आर. करपे,
हॉटेल व्यावसायिक
ग्राहकांसाठी भित्तिपत्रक
- आपल्या ठेवी सुरक्षित आहेत, बचत खाते, चालू खातेवरून एक हजार रुपये काढता येतील. मुदतपूर्ती झालेल्या ठेवीचे नूतनीकरण करता येईल. लॉकरचा वापर करता येईल. पी. एम. सी. बँकेच्या कर्जाचे व रिकरिंगचे हफ्ते दिलेल्या एस. आय. नुसार जमा होतील. मुदत ठेवीवरील मासिक व त्रैमासिक व्याज खात्यावर जमा होईल. स्वत:च्या ठेवीवर कर्ज घेतले असल्यास ठेवी बंद करून त्याची रक्कम कर्जास वर्ग करता येईल. कर्ज खात्यांमध्ये रोखीने रक्कम स्वीकारण्यात येईल, अशा स्वरूपाचे भित्तिपत्रक बँकेच्या शाखांबाहेर लावण्यात आले आहे.