‘कन्यागत’ ठरतेय भाविकांसाठी पर्वणी

By admin | Published: August 13, 2016 12:17 AM2016-08-13T00:17:30+5:302016-08-13T00:37:30+5:30

गंगास्नानासाठी गर्दी : वर्षभर होणार लाभ

Festivals for devotees of 'Kanyaagata' | ‘कन्यागत’ ठरतेय भाविकांसाठी पर्वणी

‘कन्यागत’ ठरतेय भाविकांसाठी पर्वणी

Next

संदीप बावचे / संतोष बामणे  -जयसिंगपूर --कन्यागत महापर्वकाळाचा प्रारंभ होताच हजारो भाविकांनी शुक्रवारी गंगास्नान केले. हा सोहळा यापुढे वर्षभर चालणार आहे. देवस्थान समिती, ग्रामपंचायत, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने नृसिंहवाडीचा कन्यागत मुख्य सोहळा दिमाखदारपणे साजरा झाला.
२ फेब्रुवारीला आमदार उल्हास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कन्यागत महापर्वकाळासाठी १२१ कोटींचा भरघोस निधी प्राप्त झाला होता. यानंतर नृसिंहवाडी, औरवाड, गौरवाड, आलास, शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी, आदी गावांत स्नानासाठी विविध ठिकाणी सोय करण्यात आली. तसेच तालुक्याच्या विकासात मोठी भर पडली.
कन्यागतच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडी देवस्थान समिती, पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, एस. टी. महामंडळ, आरोग्य विभाग, पालक, मंत्री, आमदार, खासदार यांच्या नियोजनामुळे गुरुवार (दि. ११) पासून कन्यागत पर्वाला प्रारंभ झाला. यात शिरोळ, नृसिंहवाडी, कवठेगुलंद, गणेशवाडी, औरवाड, आदी पालख्या स्नानासाठी रवाना झाल्या व मोठ्या उत्साहात स्नान सोहळा शुक्रवारी
(दि. १२) पार पडला.
शिरोळ येथे भोजनपात्र पालखी मिरवणूक गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. यामध्ये ‘श्रीं’च्या पालखीचे हत्ती, घोडे, उंट व संगीताच्या निनादात शिरोळ शहरातून भव्य स्वागत केल्यानंतर शुक्रवारी सकाळी मुख्य स्नान शुक्लतीर्थ येथे पार पडले. त्यानंतर ही पालखी शिरोळकडे प्रस्थान झाली. भोजनपात्र मंदिरात दिवसभर पालखीचे दर्शन भाविकांनी घेतले. दत्त मंदिर व्यवस्थापन आणि उत्सव समितीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.
नृसिंहवाडीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात होत्या. तसेच औरवाड मार्गावर रस्त्याकडेला पार्किंग केलेली चारचाकी वाहने क्रेनच्या सहायाने उचलून पार्किंगच्या ठिकाणी लावली जात होती. तसेच अनेक मुख्य मार्गांवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळविली जात होती, तर तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद दातार यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडी, औरवाड, गणेशवाडी, शेडशाळ, कवठेगुलंद, गौरवाड, आदी ठिकाणी १८ वैद्यकीय पथके सज्ज होती. ठिकठिकाणी रुग्णवाहिकाही तयार होत्या.


लोकमतचा विशेष अंक : वाचकांच्या उड्या
कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने ‘लोकमत’ने शुक्रवारी (दि. १२) कन्यागत महापर्वकाळाच्या दिवशी विशेष अंक प्रकाशित केला होता. कन्यागतची परिपूर्ण माहिती असलेल्या या अंकाचे भाविकांनी स्वागत केले. ‘लोकमत’चा हा विशेष अंक संग्रहित असल्याच्या भावना वाचकांनी व्यक्त


तोफेची सलामी
‘श्रीं’च्या पर्वकाळ स्नानानंतर शिरोळ येथील ऐतिहासिक जय भवानी तोफ उडविण्यात आली. ‘श्रीं’चे विधिवत गंगास्नान सुरू होत असताना एकवीरा भजनी मंडळ यांनी गंगा व कृष्णा लहरीचा पाठ केला. ‘श्रीं’च्या स्नानानंतर भाविकांनी औरवाड पुलानजीकचा घाट, पापविनाशी तीर्थघाट, मुख्य मंदिर परिसर, अन्नछत्र डेक परिसर, कृष्णा-पंचगंगा संगम परिसरात स्नान केले.
तात्पुरते बसस्थानक
नृसिंहवाडी येथे सुसज्ज बसस्थानक आहे; परंतु वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी कुरुंदवाड, शिरोळ मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला तात्पुरते बसस्थानक उभारले आहे. येथे सांगली, कोल्हापूर, सातारा या आगारांतून विशेष गाड्यांची सोय केली आहे. निपाणी, बेळगाव, चिक्कोडी परिसरातील एस. टी. बसेसची सोय केली आहे.


मंदिरांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
कन्यागत महापर्वकाळाच्या पार्श्वभूमीवर उद्योगपती संजय घोडावत यांच्या सहकार्यातून व आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून शुक्रवारी नृसिंहवाडी येथे दत्त मंदिर, शुक्लतीर्थ, औरवाडमधील अमरेश्वर मंदिर, आदी परिसरात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पांडुरंग माने, धनाजी पाटील-नरंदेकर आदी सहभागी झाले होते.

Web Title: Festivals for devotees of 'Kanyaagata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.