भ्रूण हत्याकांड; आणखी दोन एजंटांना अटक
By admin | Published: March 14, 2017 12:05 AM2017-03-14T00:05:38+5:302017-03-14T00:05:38+5:30
स्वातीला संदीप जाधवनेच नेले
सांगली/मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली असून, डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्याकडे लिंगनिदान व गर्भपातासाठी रुग्ण आणणाऱ्या संदीप विलास जाधव (वय ३२, रा. शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), वीरेनगोंडा ऊर्फ बंडू रावसाहेब गुमटे (वय ४३, रा. कागवाड, ता. अथणी) या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, अटकेतील संशयितांची संख्या ११ वर गेली आहे. आणखी काही डॉक्टर व एजंट पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके कर्नाटक, कोल्हापूर व सोलापूर जिल्'ात रवाना केली आहेत. मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा म्हैसाळ येथे अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. तेथे पुरलेले १९ भ्रूण सापडले. यातील मुख्य संशयित डॉ. खिद्रापुरे याला अटक करण्यात आली. तो कर्नाटकातील कागवाड, विजापूरसह आणखी काही ठिकाणी गर्भलिंग चाचणी करून म्हैसाळ येथे गर्भपात करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मृत विवाहितेचा पती प्रवीण जमदाडे याच्यासह डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे, डॉ. श्रीहरी घोडके, डॉ. रमेश देवगीकर, परिचारिका कांचन रोजे, उमेश साळुंखे, सुनील खेडेकर, सातगोंडा पाटील, यासिन तहसीलदार या दोन एजंटांसह नऊ जणांना यापूर्वी अटक केली आहे. (प्रतिनिधी)
कोठडीत वाढ
अटकेतील डॉ. श्रीहरी घोडके, उमेश साळुंखे, कांचन रोजे, डॉ. रमेश देवगीरीकर, सुनील खेडेकर या पाचजणांच्या पोलिस कोठडीची सोमवारी मुदत संपल्याने त्यांना दुपारी न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या कोडठीत १६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. खिद्रापुरेची पोलिस कोठडी १७ मार्चला संपणार आहे.
मुंबईतून औषधांचा पुरवठा--खिद्रापुरेला गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा माधवनगरच्या सुनील खेडकर याने केल्याचे निष्पन्न होताच, त्याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी सुरु आहे. तो माधवनगरच्या एका औषध फर्मकडे नोकरीला आहे; पण त्याने ही औषधे मुंबईतील एका कंपनीतून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. तो नेहमी या कंपनीतील कामगाराच्या संपर्कात असे. या कामगाराकडून त्याने औषधे घेऊन ती खिद्रापुरेला पुरविली आहेत. कामगाराच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना होणार आहे.
दोघांकडून कमिशन
अटक केलेला एजंट वीरेनगोंडा गुमटे हा डॉ. श्रीहरी घोडके व खिद्रापुरे या दोघांसाठी काम करीत होता. घोडकेकडे तो महिलांना गर्भलिंग निदान करण्यासाठी, तर खिद्रापुरेकडे गर्भपात करण्यासाठी नेत होता. या बदल्यात दोघांकडून त्याला चार ते आठ हजार रुपये कमिशन मिळत होते. आतापर्यंत त्याने चार प्रकरणात कमिशन घेतले आहे.
स्वातीला संदीप जाधवनेच नेले
नव्याने अटक केलेला एजंट संदीप जाधव यानेच स्वाती जमदाडे यांना खिद्रापुरेकडे गर्भपातासाठी नेले होते, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. या बदल्यात त्याने खिद्रापुरेकडून चार हजार रुपये कमिशनही घेतले होते. तसे पुरावेही मिळाल्याने रविवारी रात्री पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या पथकाने शिरढोण येथे छापा टाकून संदीपला अटक केली.