ताप- बालस्वास्थ

By admin | Published: February 21, 2017 11:49 PM2017-02-21T23:49:41+5:302017-02-21T23:49:41+5:30

शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते

Fever-childhood | ताप- बालस्वास्थ

ताप- बालस्वास्थ

Next

गेल्या काही लेखांमध्ये आपण बालआरोग्याबाबत प्राथमिक माहिती घेतली. आता बालरुग्णांच्या काही सर्वसाधारण तक्रारी व त्याबाबत पालकांनी घ्यावयाची काळजी जाणून घेऊया. डॉक्टरांकडे येणाऱ्या बहुतेक बालरुग्णांच्या पालकांची मुख्य तक्रार ताप ही असते. काही पालक आपल्या मुलाच्या तापाबाबत अतिसंवेदनशील असल्याने ताप असल्याची खात्रीदेखील न करता वारंवार ताप येत असल्याची तक्रार करीत असतात व वारंवार उपचार करीत असतात. बाह्य वातावरणामधील तापमानामध्ये बदल झाला तरी स्वत:च्या शरीराचे तापमान एका ठरावीक मर्यादेमध्ये नियंत्रित ठेवण्याची क्षमता मानवामध्ये असते. त्यामुळे काश्मीरमधील बर्फाने गोठलेले वातावरण ९९.६ अंश +१ अंश सेल्सिअस या मर्यादेमध्ये कायम ठेवले जाते. यासाठी मेंदूमधील तापमान नियंत्रित करणारे केंद्र काम करीत असते. अनेक तात्पुरत्या कारणांमुळे या केंद्राची क्षमता शिथिल झाल्यास शरीराचे तापमान या मर्यादेबाहेर जाते. आपण त्याला ताप म्हणतो. अनेक प्र्रकारचे जंतूसंसर्ग किंवा विषाणू संसर्ग हे तापाचे महत्त्वाचे कारण आहे. ताप कमी करणाऱ्या औषधांमुळे व ज्या कारणामुळे जंतूसंसर्ग झाला आहे, त्या मूळ कारणाचा इलाज केल्यावर परत शरीराचे तापमान कार्यक्षमतेने नियंत्रित केले जाते. या ताप आलेल्या कालावधीमध्ये आपल्या मुलाची काळजी कशी घ्यावी ते पाहूया.
शरीराचे वाढलेले तापमान प्रत्येकवेळी शरीराला हानीकारक असते असे नाही. तर सुरुवातीच्या काळामध्ये शरीराच्या तापमानामध्ये होणारी वाढ शरीराला उपकारक असते. या वाढलेल्या तापमानामुळे जंतूंची वाढ रोखून धरली जाते. पांढऱ्या पेशी उत्तेजित झाल्याने त्या जंतूंशी सक्षमपणे मुकाबला करण्यास सज्ज होतात. तसेच रक्ताभिसरण क्रिया जलद झाल्याने या पेशी जंतूसंसर्गाच्या ठिकाणी त्वरेने पोहोचविल्या जातात. त्यामुळे असा अल्पप्रमाणामध्ये वाढलेला ताप औषधाद्वारे लगेच कमी करण्याची गरज नसते.
अनेकदा असा ताप लगेच सर्व अंग ओल्या कपड्याने पुसून कमी करण्याची आवश्यकता नसते. अन्यथा थंडी वाजून ताप वाढू शकतो व सर्दी होऊ शकते. सर्वसाधारणपणे १०० अंश फॅरनहीटपर्यंत वाढलेल्या तापाला त्वरित औषधोपचाराची गरज नसते. या मर्यादेपलीकडे ताप गेल्यास बाळ कीरकीर करते, खाणे-पिणे कमी करते, अस्वस्थ होते. अशा वेळी पालकांनी केवळ डोक्याला अथवा पोटाला हात लावून ताप पाहण्यापेक्षा थर्मामीटरने दर दोन तासाने मुलाचे तापमान पाहून ताप कमी करणारे औषध डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात घालावे. सर्वसाधारणपणे दिसून येणारा ताप हा विषाणूजन्य असल्याने तो तिसऱ्या, चौथ्या दिवसापासून उतरणीस लागतो व थांबून जातो. दरम्यानच्या काळात घाबरून जाऊन अनावश्यक रक्त, लघवीच्या चाचण्या करू नयेत. तसेच अँटिबायोटिक्सचा वापर करू नये. तीन-चार दिवसांनंतर ताप कायम राहिल्यास डॉक्टरी सल्ल्याने पुढील औषधोपचार करणे योग्य ठरेल.
प्रत्येक आजाराचा कालावधी सर्वसाधारण असतो. लहान मुलांमधील बहुतेक आजार विषाणूजन्य असल्याने ते काही दिवसांमध्ये बरे होतात. त्यामुळे अशा प्रसंगी पालकांनी संयम ठेवल्यास अनावश्यक रक्तचाचण्या व अँटिबायोटिक्स वापर टाळता येईल. असे लहान आजार बरे होताना मुलाच्या प्रतिकारक्षमतेत वाढ करीत असल्याने जसे मुलांचे वय वाढते, त्याप्रमाणे मुले आजारी पडण्याचे प्रमाण कमी होत जाते. ज्या पालकांच्या घरी लहान मुले आहेत, त्यांनी घरामध्ये नेहमी थर्मामीटर व तापाचे औषध ठेवावे. तापाच्या कालावधीच्या तापमानाची दर तीन-चार तासाने नोंद ठेवून डॉक्टरांना रोगनिदानासाठी मदत करूया व जबाबदार पालक बनूया.


- डॉ. मोहन पाटील

Web Title: Fever-childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.