थोड्या तक्रारी; काही ठिकाणी सेवाही चांगली -‘राधानगरी‘तील आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:41 PM2019-05-17T21:41:48+5:302019-05-17T21:43:09+5:30

राधानगरी तालुक्यातील सुमारे सव्वादोन लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागाची सहा आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. एका ठिकाणी आरोग्य पथक आहे.

Few complaints; Good service at some places- 'Petrolinar Health Center' | थोड्या तक्रारी; काही ठिकाणी सेवाही चांगली -‘राधानगरी‘तील आरोग्य केंद्र

थोड्या तक्रारी; काही ठिकाणी सेवाही चांगली -‘राधानगरी‘तील आरोग्य केंद्र

Next
ठळक मुद्देरांबाबत संमिश्र प्रतिक्रिया-राशिवडे, धामोडबाबत तक्रारी; कसबा तारळे, कसबा वाळवेत चांगली सेवा

संजय पारकर ।
राधानगरी : राधानगरी तालुक्यातील सुमारे सव्वादोन लाख लोकसंख्येसाठी जिल्हा परिषेदेच्या आरोग्य विभागाची सहा आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. एका ठिकाणी आरोग्य पथक आहे.
३८ ठिकाणी आरोग्य उपकेंदे्र आहेत. यासाठी विविध संवर्गातील १३७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या
११६ कर्मचारी कार्यरत आहेत. सर्वसाधारणत: यातून दिलेल्या सेवांबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सरवडे, कसबा तारळे, कसबा वाळवे या दवाखान्यांत चांगली सेवा मिळते, असे दिसते. तर राशिवडे, धामोड येथील सेवांबाबत तक्रारी आहेत.
प्रत्येक आरोग्य केंद्रांत दोन डॉक्टर गरजेचे असतात. सध्या सरवडे व कसबा वाळवे येथे एकच डॉक्टर आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी मिळणाऱ्या सेवेबाबत चांगल्या प्रतिक्रिया आहेत. याउलट राशिवडे व धामोड येथे मोठ्या तक्रारी आहेत. राशिवडे येथे रुग्णांना औषधे, सलाईनच्या पाईप व अन्य काही साहित्य बाहेरून विकत आणण्यास सांगितले जाते. दोन्हीपैकी एकच डॉक्टर उपस्थित असतात, तर बºयाच वेळा सहायकच रुग्णांवर उपचार करतात, अशा तक्रारी आहेत. धामोड येथे दूरवरून येणाºया रुग्णांना दुरुत्तरे करीत वेळीच दखल घेतली जात नाही. बºयाच वेळा त्यांची हेळसांड होत असल्याची तक्रार होत आहे.
तालुक्यात आडोली, म्हासुर्ली व आणाजे येथे आयुर्वेदिक दवाखाने आहेत. मात्र, यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे. या तिन्ही ठिकाणी मिळून एकच डॉक्टर आहे. आठवड्यातून प्रत्येकी दोन दिवस त्यांनी हजर राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, ते जेमतेम एखाद्या दिवशीच हजेरी लावतात, असे स्थानिक लोक सांगतात. तसेच यासाठी आवश्यक असलेली औषधे अपवादानेच मिळतात. त्यामुळे लोकही येथे जाण्याचे टाळतात. या ठिकाणी एका सहायकाची नेमणूक आहे; पण डॉक्टर नसतील तेव्हा तोही सापडत नाही. म्हासुर्ली व आडोली ही दोन्ही गावे दुर्गम भागात असून, त्या परिसरात अनेव गावे व वाड्या-वस्त्या आहेत. त्यांना जवळपास सरकारी दवाखाने नाहीत.
तालुक्यात मागील वर्षात एक लाख ११ हजार ६३७ रुग्णांनी बाह्य उपचार घेतले आहेत. तर सात हजार ६५२ रुग्णांनी काही दिवसांसाठी राहून उपचार घेतले आहेत. केंद्रनिहाय असे रुग्ण याप्रमाणे : कंसात आंतररुग्ण धामोड १३७७३ (११५७), राशिवडे २३४४० (९२३), सरवडे १९२८९ (१३९५), कसबा तारळे १९२१५ (१५२१), ठिकपुर्ली १५१५१ (१३४१), कसबा वाळवे २०७६९ (१२२५). वर्षभरात एका मातेचा मृत्यू झाला असून, तब्बल १२ नवजात बालके मृत्युमुखी पडली आहेत. यापैकी सहा बालके उपजत दगावली आहेत. तर एक ते पाच वयोगटातील आठ बालकेही दगावली आहेत.
आरोग्य विभागातील डॉक्टर व काही पदे निवासी स्वरूपाची असतात. तसेच आरोग्य उपकेंद्रात नेमणूक असलेल्या आरोग्यसेविका यांनीही त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांना निवास्थान उपलब्ध करून दिलेले आहे. मात्र, अपवादात्मक ठिकाणीच कर्मचारी निवासी आहेत. बहुंताश कर्मचारी शहरात किंवा आपल्या गावात राहून ये-जा करतात. अनेक कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. यापैकी काही कामचुकार झाले आहेत. नवीन, कंत्राटी येणाऱ्यांना राबवून घेतले जाते. तालुक्यात चांगले काम करणारे डॉक्टर, कर्मचारीही आहेत. होऊन गेले आहेत.
कसबा तारळे येथे डॉ. एम. एम. कदम यांनी त्यांच्या काळात तेथे केंद्राचा कायापालट केला होता.तत्पर व योग्य सेवा मिळत असल्याने त्यावेळी तेथे येणाºया रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र, त्यांच्या बदलीनंतर हे प्रमाण कमी झाले. धामोड येथे ज्ञानेश्वर ठोंबरे या डॉक्टरांनी आपल्या काळात २४ तास रुग्णसेवा करण्याचा संकल्प करून त्याची सुरुवात केली होती. प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांची नेमणूक केली आहे.
दाजीपूरची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
दाजीपूर येथे नवीन आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत बांधून पूर्ण झाली आहे. मात्र, अजून अन्य सोपस्कार पूर्ण न झाल्याने ते सुरू झालेले नाही. म्हासुर्ली येथेही नवीन केंद्र मंजूर झाले आहे. इमारतीचा भूमिपूजन सोहळाही झाला आहे. मात्र, पुढे काहीच हालचाल नाही.

तालुक्यातील आरोग्य सेवेबाबत काही अडचणी व तक्रारी आहेत. मात्र, चर्चा व समन्वयातून मार्ग काढून त्यातून मार्ग काढला जाईल. प्रसंगी कठोर कारवाई केली जाईल.
- डॉ. आर. आर. शेटे, तालुका आरोग्य अधिकारी.


आरोग्य सुविधेची गरज असलेल्या दुर्गम अशा म्हासुर्ली येथील आयुर्वेदिक दवाखाना, हा असा सदा बंद अवस्थेत असतो.

Web Title: Few complaints; Good service at some places- 'Petrolinar Health Center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.