‘फिक्की’चे अवॉर्ड शैलेश बलकवडे, अभिनव देशमुख यांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:23 AM2021-03-21T04:23:43+5:302021-03-21T04:23:43+5:30
कोल्हापूर : फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने (फिक्की) महाराष्ट्राला तीन स्मार्ट पोलीस अवॉर्ड शनिवारी जाहीर झाले. कोल्हापूरचे ...
कोल्हापूर : फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने (फिक्की) महाराष्ट्राला तीन स्मार्ट पोलीस अवॉर्ड शनिवारी जाहीर झाले. कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी कोल्हापुरात राबविलेल्या ‘आय बाईक उपक्रम’ तसेच कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना आदिवासींच्या मुलांसाठी राबविलेल्या ‘माझे पोलीस स्टेशन, माझे ज्ञान मंदिर’ या उपक्रमाला हे अवाॅर्ड जाहीर झाले आहे. याशिवाय तिसरा अवॉर्ड औरंगाबाद येथील महिला पोलीस अधिकारी मोक्षदा पाटील यांना ‘महिला सुरक्षे’बाबत अवॉर्ड जाहीर झाले.
शनिवारी सकाळी दिल्लीहून ऑनलाईन व्हीसीद्वारे या अवॉर्डची घोषणा करण्यात आली. ‘फिक्की’ या देशपातळीवरील संघटनेतर्फे विविध निकषांतून दरवर्षी हे अवॉर्ड जाहीर होतात. गेली तीन वर्षे स्मार्ट पोलिसांना हे अर्वार्ड जाहीर होत आहेत. दहशतवाद, क्राईम रेट, महिला सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, सीनिअर सिटीझन, गुंतागुंतीच्या तपासाला हे अवॉर्ड जाहीर होतात.
सद्या पुणे ग्रामीणमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकपदी असलेले अभिनव देशमुख यांनी कोल्हापुरात अधीक्षकपदी कार्यरत असताना २०१९ मध्ये प्रथम कोल्हापुरात ‘आय बाईक’ हा गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष उपक्रम राबविला. त्याचे अनुकरण संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आले. ‘आय बाईक’ या उपक्रमामुळे गुन्ह्यांची झटपट उकल होण्यास मदत झाली. त्यामुळे या उपक्रमाबाबत अधीक्षक देशमुख यांना हा अवॉर्ड जाहीर झाला.
कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी गडचिरोली अधीक्षकपदाच्या कारकिर्दीत नक्षलवादी आदिवासींच्या मुुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘माझे पोलीस स्टेशन, माझे ज्ञान मंदिर’ हा सामाजिक उपक्रम राबवला. त्यामुळे नक्षलवाद्यांत परिवर्तन झाले, याची दखल घेऊन हा अवॉर्ड अधीक्षक बलकवडे यांना जाहीर झाला.
कोट...
गडचिरोली या आदिवासी भागात ‘माझे पोलीस स्टेशन, माझे ज्ञान मंदिर’ हा उपक्रम राबवून नक्षलवाद्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, त्यांच्यासाठी रोजगार मेळावे घेतले, त्यातून नक्षलवाद्यांत परिवर्तन झाले, त्याचे परिपाक म्हणून हा अवॉर्ड मिळाला. - शैलेश बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर.
कोट..
कोल्हापुरात ‘आय बाईक’ या उपक्रमाची सुरुवात झाली, त्यातून गुन्हेगारी उकल होण्यास मोठी मदत झाली. पथकांचीही कामगिरी चांगली झाली. हाच उपक्रम राज्यभर राबवला जात आहे, ही समाधानाची बाब आहे. - अभिनव देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण..........