चंद्रकांतदादांच्या रोख-ठोक स्वभावावर फिदा : मुश्रीफ
By admin | Published: February 14, 2016 12:55 AM2016-02-14T00:55:39+5:302016-02-14T00:55:39+5:30
दादांची उडविली खिल्ली : बॅँकेच्या वक्तव्यांचा न्यायालयात उपयोग
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यांचे आत एक आणि बाहेर एक कधीच नसते. तोंडात येईल ते बोलतात. त्यांचा रोखठोक स्वभाव आपणाला आवडतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्री पाटील यांची खिल्ली उडविली.
जिल्हा बॅँकेबाबत गेल्या महिन्या-दीड महिन्यांत मंत्री पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांचा न्यायालयात खूप उपयोग झाल्याची कबुलीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार मुश्रीफ यांनी पालकंमत्री पाटील यांचे चांगलेच चिमटे काढले. आमदार मुश्रीफ म्हणाले, परवा सांगली जिल्ह्णात म्हैसाळ योजनेसाठी सरकारने निधी द्यावी, अशी मागणी तेथील जनतेने केली; पण मंत्री पाटील यांनी पाच कोटी लोकवर्गणीची मागणी केल्याची चर्चा आहे. हा दादांचा प्रामाणिकपणा असल्याचा टोला हाणत सांगलीतील जनतेकडे पैसे छापण्याचा कारखाना आहे का? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. कन्यागत पर्व, नाशिकच्या कुंभ मेळाव्यासाठी हजारो कोटी देण्यास सरकारकडे पैसे आहेत, मग दुष्काळी सांगलीकरांसाठी सरकारकडे पैसे नाहीत का? अशी त्यांच्या सरकारमधील सहकारी म्हणत असल्याचा टोला त्यांनी हाणला.
जिल्हा बॅँकेबाबत नो कॉमेंटस्
जिल्हा बॅँकेबाबत २ मार्चला सुनावणी होणार आहे. ही न्यायालयीन बाब असल्याने आपण बोलणे योग्य होणार नसल्याचे आमदार मुश्रीफ म्हणाले.
काळम्मावाडीतून कर्नाटकला ७५ टक्केच पाणी
कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात जाऊन काय मिळविणार, तवंदी घाट परिसरात पाणी नाही. परवा खासदार प्रकाश हुक्किरे यांनी काळम्मावाडीतून कर्नाटकच्या वाट्याचे १०० टक्के पाणी सोडण्याची विनंती केली होती; पण यंदा धरणच ७५ टक्केभरल्याने देय पाण्याच्या ७५ टक्केच पाणी कर्नाटकला सोडणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.