मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांसाठी फिल्डिंग
By admin | Published: May 15, 2015 12:11 AM2015-05-15T00:11:41+5:302015-05-15T23:37:33+5:30
लवकरच बदल्यांचा धडाका : आमदार, मंत्र्यांच्या शिफारशीसह थेट मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव
एकनाथ पाटील - कोल्हापूर --जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या ३० मेअखेर होणार आहेत. या बदल्यात एका यंत्रणेकडून आपल्या मर्जीतील अधिकारी ठरावीक पोलिस ठाण्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना काही आमदार व मंत्र्यांच्या शिफारशींचा खास प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये नवीन आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सध्या कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे (करवीर), दिनकर मोहिते (जुना राजवाडा), धन्यकुमार गोडसे (लक्ष्मीपुरी) अरविंद चौधरी (शाहूपुरी), अनिल देशमुख (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), संभाजी गायकवाड (गांधीनगर), साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश खुणे (शहर वाहतूक शाखा), अनिल तनपुरे (गोकुळ शिरगाव), आदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी गृहखात्याला विशेष यादी पाठविण्यात आली आहे. प्रस्ताव यादीमध्ये सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस मुख्यालयात नियुक्ती देण्यात यावी, अशी शिफारसही करण्यात आली आहे. या बदल्यांच्या नाट्यमय घडामोडींमध्ये एका अधिकाऱ्याने आपले राजकीय वजन वापरून थेट दिल्लीतून बदली रद्द केल्याचे समजते.
जिल्ह्याच्या जवळपास राहणाऱ्या पोलीस निरीक्षकांसह साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकीय वजन वापरून दर तीन वर्षांनी जिल्ह्यांतर्गत बदल्या करून घेण्यामध्ये तरबेज असतात. दोन वर्षांपूर्वी गुन्हेगारी टोळ्यांनी वर्चस्व वादातून शहराला वेठीला धरले होते. काही लोकप्रतिनिधींच्या आश्रयाला हे गुन्हेगार असल्याने त्यांचा समाजात खुलेआम वावर असे. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुंडगिरी मोडत अवैध व्यावसायिकांची पाळेमुळे मोडीत काढण्याचे आदेश दिले. त्यांच्या कारवाईमुळे दोन नंबरची संपूर्ण फळी डॉ. शर्मा यांच्या विरोधात गेली. त्यांच्या बदलीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली; परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे डॉ. शर्मा यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना बदलून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला आहे. जिल्हाअंतर्गत प्रशासकीय बदल्यांचे अधिकार शर्मा यांना असले तरी या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश थेट गृहखात्याकडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.